सोलापूर : एका अज्ञात भामट्याने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात भामाट्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे नं 59 येथे श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास आहे. या भक्त निवासामध्ये खोली बुकींग साठी https://yatradham.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने काऊंटर बुकिंग सुविधा देखील आहे.
या भामट्याने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाचे नावाने https://shrivitthalrukminibhaktaniwas.in/ असे बोगस (फेक) संकेतस्थळ (वेबसाईट) तयार केली . त्यावरील मो. 9045033719 वरून खोल्या बुकिंग केल्या जातात असे सांगून भाविकांचे पैसे स्वीकारले. या भामट्याने भाविकांना त्याची पावती देखील दिली आहे.
साधारण 6 ऑक्टोबरपासून अशा भाविकांनी भक्तनिवास येथील दुरध्वनीवर संपर्क केला असता हा प्रकार उघडकीस आला. काही भाविक त्याच्याकडे केलेल्या बुकिंग नंतर भक्तनिवास येथे प्रत्यक्ष वास्तव्यास आले असता त्यांची फसवणूक झाल्याचं मंदिर प्रशासनाला समजलं.
आता इतर भाविकांनी फसवणूक होऊ नये, तसेच फसवणूक झालेल्या भाविकांना न्याय देण्याच्या दॄष्टीने या भामाट्याच्या विरोधात पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता पंढरपूर शहर पोलिस व https://cybercrime.gov.in/ यांचे कडे मंदिर समितीच्या वतीने लेखी तक्रार दिल्यानंतर तपासला सुरुवात झाली आहे .
तरी भाविकांनी यापुढे मंदिर समितीच्या भक्त निवास येथे राहण्यासाठी https://yatradham.org या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ऑफलाईन पद्धतीने खोली काऊंटर बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे .