सोलापूर: माढा मतदारसंघात इच्छुक असलेले अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुलाखतीसाठी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून लोकसभा प्रचारादरम्यान त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली होती. त्यांनी शेवटच्या दोन दिवसात शरद पवार गट सोडून भाजपचा प्रचार केला होता. यानंतर त्यांच्या कारखान्यावरची जप्ती लगेच मागे घेण्यात आली होती. तसेच कर्जात अडकलेल्या कारखान्याला मोठं आर्थिक पॅकेजही देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अशी अभिजीत पाटील यांची ओळख आहे. आता त्यांनी माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांनी फडणवीसांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे.
माढ्यात अनेकजण इच्छुक
पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विविध मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. माढा विधानसभेसाठी संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील, नितीन कापसे अशा जवळपास दहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यात आमदार बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी देखील मुलाखत दिल्याची माहिती आहे.
ज्यांची नावं चर्चेत, तेच उपस्थित नाहीत
अभिजीत पाटील यांनी याआधी अपक्ष निवडणूक लढविण्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माढा मतदारसंघातून शरद पवार हे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना उमेदवारी देणार अशी शक्यता असताना रणजीत शिंदे मात्र या मुलाखतीसाठी पोचलेले नव्हते. तसेच मोहिते पाटील गटाकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असताना तेही मुलाखतीसाठी तिथे हजर नसल्याचे समजते.
ही बातमी वाचा: