Pandharpur News : राज्यात सत्तांतराचं नाट्य सुरु असताना सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल आणि दामाजी या दोन साखर कारखान्याच्या निवडणूक झाल्या. या दोन्ही निवडणूक पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अत्यंत महत्वाच्या असताना भाजपमधील गटबाजीमुळे मंगळवेढ्यात भाजपचाच पराभव झाला आणि भाजपच्या हातातील कारखान्यावरील सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. काल (14 जुलै) रात्री उशिरा संपलेल्या मतमोजणीत भाजप आमदार समाधान अवताडे यांची या कारखान्यावरील सत्ता संपुष्टात आली असून भाजपच्याच प्रशांत परिचारक गटाने राष्ट्रवादीच्या मदतीने या कारखान्यावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे याना भाजपच्या तालुकाध्यक्षाकडून पराभूत होण्याची नामुष्की समोर आली.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने परिचारक आणि समाधान अवताडे या दोन्ही गटाने एकत्रित करुन निवडणूक जिंकून दाखवली होती. यानंतर परिचारक आणि अवताडे गटात सर्वच ठिकाणी मनोमिलन दिसत होते. मात्र मंगळवेढा येथील दामाजी कारखाना निवडणुकीत आमदार समाधान अवताडे यांच्याविरोधात परिचारक यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस या विरोधकांना एकत्रित करत निवडणूक लढवली. यावेळी भाजपच्याच मतांमध्ये विभागणी होत भाजपचा एक गट विरोधात गेल्याने अवताडे याना पराभूत व्हावे लागले तर भाजपच्याच प्रशांत परिचारक गटाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीने हा कारखाना जिंकला आहे.
काही दिवसापूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी सत्ताधारी भालके गटाचा दारुण पराभव करत नवख्या अभिजीत पाटील यांनी हा कारखाना जिंकला होता. राष्ट्रवादीची पीछेहाट सुरु असताना मंगळवेढा येथील दामाजी कारखाना निवडणुकीत मात्र परिचारक यांनी अवताडे यांच्या मागे ताकद लावण्याऐवजी राष्ट्रवादीचे भालके आणि काँग्रेसचे नेत्यांच्या मागे आपली ताकद उभी केली आणि यात भाजपला पराभूत व्हावे लागले. या निकालामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांतही अवताडे विरुद्ध परिचारक-भालके असे चित्र उभे राहण्याची शक्यता असल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. या सर्व प्रकारानंतर भाजप पक्षश्रेष्ठींना यात लक्ष घालावे लागणार असून अन्यथा भाजपमधील दुहीचा थेट फायदा राष्ट्रवादीला मिळणार आहे.
आमदार समाधान अवताडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय कट्टर समर्थक आहे. फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पक्षाकडून अवताडे यांना देण्यात आल्या होत्या. समाधान अवताडे यांनी आपल्या आमदारकीच्या अल्पकाळात जनतेत थेट मिसळण्याचा प्रयत्न ठेवल्याने मतदारांत त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती. भाजपमधील सत्तासंघर्ष यातूनच उफाळून आला असून पुन्हा अवताडे विरुद्ध परिचारक असा वाद सुरु झाल्यास याचा थेट फायदा भालके गटाला मिळणार आहे. एकंदर विठ्ठलाच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला हद्दपार केले असताना दामाजीमध्ये मात्र परिचारक यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या भालके यांना पुन्हा ताकद मिळाली आहे. आता पक्षश्रेष्ठी या प्रकरणात काय भूमिका घेणार हे येत्या कालावधीत स्पष्ट होणार असले तरी सध्या मात्र दामाजी जिंकूनही पक्षीय पातळीवर परिचारक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.