सोलापूर : डॉक्टर होण्यासाठी खूप पैसा लागतो, पैसा असल्याशिवाय डॉक्टर होता येत नाही. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील NEET (Neet) ची परीक्षा देण्यासाठी महागडे क्लासेस लावावे लागतात किंवा पुणे, मुंबई, लातूर याठिकाणीच जाऊन अभ्यास करावा लागतो, असा समज एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने केवळ अभ्यासावर श्रद्धा ठेऊन मोडून काढला. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहरातील रहिवासी असलेले नागेश दगडू घोलप हे आपल्या तीन भावांसोबत एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांची कन्या श्रध्दा नागेश घोलप हिने मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट” च्या परीक्षेत 720 पैकी 543 गुण प्राप्त करीत उज्वल यश प्राप्त केले आहे. श्रद्धाचे हे यश ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रेरणा देणारे असून गरिबांचीही मुलं डॉक्टर होऊ शकतात हे तिने दाखवून दिलंय. 


श्रध्दा नागेश घोलप हिचे प्राथमिक शिक्षण बार्शी येथील आदर्श मराठी शाळा, माध्यमिक शिक्षण सौ.हि.ने. शहा कन्या प्रशाला येथे झाले असून तिने दहावी मध्ये 93.80 % तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत 89.67% गुण मिळवले. गेल्या दोन वर्षापासून नीट परिक्षेसाठी प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑनलाईन व ऑफलाईन तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे तिने लातूर , पुणे, मुंबई या ठिकाणी क्लासेस न करता आपल्या गावातूनच अभ्यास करत हे उज्वल यश मिळविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात असलेल्या घोलप परिवाराने पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांच्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. श्रद्धा घोलप ही हिंदू खाटीक समाजाची असून तिचे एकत्रित कुटुंब आहे. श्रद्धांच्या वडिलांनी इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे ते शेळ्या खरेदी विक्री व मटन विक्रीचा व्यवसाय करतात, मोठे चुलते संतोष घोलप हाच व्यवसाय करतात, दुसरे चुलते पत्रकार गणेश घोलप व तिसरे चुलते वडाळ्यातील शिक्षक गोविंद घोलप यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. दरम्यान, या यशाबद्दल तिचे हिंदू खाटीक समाजासह सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. 


न्यूनगंड न बाळगता तयारी करावी


सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी “नीट” च्या परीक्षेला न घाबरता सातत्यपूर्ण अभ्यास व सराव परीक्षांच्या माध्यमातून आत्मविश्वास पूर्वक तयारी केली तरच हमखास यश प्राप्त करता येते हे तिने सिध्द करुन दाखविले आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की, या परीक्षेत इंग्रजी माध्यमाचे किंवा सीबीएससी बोर्डाचेच विद्यार्थी यशस्वी होतात परंतु असे काहीही नाही. मी हे यश प्राप्त करत असताना मला वडाळा ता. उत्तर सोलापूर येथील न्यु हायस्कूल व  जुनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष बळीराम (काकासाहेब) साठे, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र (बाबासाहेब) साठे, प्राचार्या प्रा.डॉ. वैशालीताई साठे व सर्व प्राध्यापक , शिक्षक आणि बार्शी येथील सक्सेस क्लासेसचे सचिन शिराळ व सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सततच्या सराव परीक्षांमुळे भीती दूर होऊन हे यश संपादित केले असल्याची प्रतिक्रिया श्रद्धा घोलप हिने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI