MNS Dilip Dhotre : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतादरसघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात आघाडीवर आहेत. अशातच माढा (Madha) आणि सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातही वेगानं घडामोडी घडत आहेत.  कारण सोलापूर आणि माढ्यात अडचणीत असलेल्या भाजपच्या मदतीला मनसे मैदानात उतरली आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी आजपासून माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार सुरु केला आहे. त्यामुळं भाजपला दिलासा मिळाला आहे. 


सोलापूर जिल्ह्यात मनसेची  मोठी ताकद


माढा लोकसभा मतादरसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंड, उत्तम जानकर यांनी फिरवलेली पाठ आणि भगीरथ भालके यांनी धरलेला काँग्रेसचा हात, यामुळं माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अडचणीत आलेल्या भाजपसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रचार करण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आज पंढरपूरमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना धोत्रे यांनी ही घोषणा केली. मनसेची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद असून ही ताकद आता महायुतीच्या मागे उभी राहणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर व सोलापूर लोकसभा उमेदवार राम सातपुते याना मोठा फायदा होणार असल्याचे धोत्रे म्हणाले. दोन्ही मतदारसंघात गावोगावी मनसैनिक असल्याने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा उभी करुन आजपासून प्रचारात उतरणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. 


माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळं भाजपला अडचण निर्माण झाली आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबियांनी सांगून रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एका लाखाहून अधिक मताधिक्क्य दिलं होतं. त्यामुळं यावेळी धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, अखेर भाजपनं मोहिते पाटलांना उमेदवारी डावलून रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं मोहिते पाटलांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोलापूर थोडं कठीण, माढा जिंकणं आमच्यासाठी जास्त कठीण; भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या कबुलीनंतर सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली