Maharashtra Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा BRS पक्षात प्रवेश केलाय. सोमवारी संध्याकाळी हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात या गाव पुढऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. यामध्ये 60 आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असल्याचा BRS पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते सचिन सोनटक्के यांनी दावा केलाय. या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून तब्बल 60 वाहनांचा ताफा हैद्राबादला शक्तिप्रदर्शनासह रवाना झाला होता. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आजी-माजी सरपंचांनी शक्तिप्रदर्शन करीत राजकीय प्रवेश केल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. BRS च्या वाढत्या प्रभावमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांची डोकेदुःखी वाढण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशानंतर खोचक टीका केलीय. काळजी करण्याचे कारण नाही काही हौसे नवशे लोक गेलेले आहेत. हैदराबाद फिरायला मिळतंय आणि जाता येता मजाही करायला येते म्हणून या विचाराने काही लोक गेलेले असतात. अशी खोचक टीका भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केलीय. यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की "महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ते भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सामान्य मतदारांच्या अपेक्षा या फडणवीस, मोदी आणि भाजपकडून आहेत. त्यामुळे मतदार भाजप सोबतच राहील. हैदराबाद फिरायला मिळतंय आणि जाता येता मजाही करायला येते म्हणून या विचाराने काही लोक गेलेले असतात. 'बापू माझा काही विषय नाही, मी उगीच आलोय' असा फोनही हैदराबाद मधून मला आला. कार्यकर्ते असतात, हैदराबाद बघायला मिळतं म्हणून काही कार्यकर्ते जाऊन आलेत. 
सोलापूर जिल्ह्यात विशेषत: दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप सक्षमपणे उभा आहे. कोणालाही काळजी करण्याचे कारण नाही काही हौसे नवशे लोक गेलेले आहेत. मतदानाच्या वेळेस मात्र हे सगळे आमच्या सोबत असतील. एखादा राज्याचे मुख्यमंत्री सहाशे गाड्या घेऊन जेव्हा येतो त्यामुळे तो कसा आहे हे बघण्याचे आकर्षण असते.जेव्हा थोडा काळ जाईल तेव्हा सत्य परिस्थिती समोर येईल आणि लोक परत येतील" अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.


"होय आम्ही हैद्राबाद फिरायला गेलो होतो, पाहणीकरूनच प्रवेश केला, येत्या काळात 650 सरपंच सोबत येतील, BRS चे प्रतिउत्तर"


भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षप्रवेश केलेल्या बीआरएसच्या आजी-माजी सरपंचांवर टीका केल्यानंतर बी आर एस करून देखील प्रतिउत्तर देण्यात आला आहे. "हो आम्ही हैदराबाद फिरायला गेलो होतो. हैदराबादमध्ये केसीआर यांनी केलेला विकास आम्ही तिथे पाहिला. त्यानंतरच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सरपंचांना हौशे, नवसे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे आमदारांनी अशी टीका करू नये. तसेच येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील 650 सरपंच आमच्या सोबत BRS मध्ये येतील. 12-15 ऑगस्ट दरम्यान तेलंगनाचे अर्थमंत्री हरीश राव हे सोलापुरात येतील. या दौऱ्यात ही प्रवेश होतील." असे प्रतिउत्तर BRS चे दक्षिण सोलापूरचे नेते सचिन सोनटक्के यांनी दिलं. 


BRS म्हणजे आधुनिक मोगल, सोनं लुटण्यासाठी ते महाराष्ट्रात, काँग्रेसची टीका


BRS, एमआयएम सारखे पक्ष हे पावसाळ्यातील छत्र्यासारखे आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रतील काँग्रेसच्या स्थितीवर होणार नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात BRS सारखे दोनशे पक्ष येऊन गेलेत. त्यांना केवळ निवडणुका करायच्या आहेत. राज्यातील सोनं त्यांना लुटून न्यायाचे आहे. आधुनिक काळातील मोगल जरी यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केवळ लुटारू वृत्तीने हे महाराष्ट्रात येतं आहेत. जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही. काँग्रेस जनतेची सेवा करण्यासाठी निर्माण झालंय. येत्या काळात काँग्रेसचाच आमदार दक्षिण सोलापुरात निवडून येईल." अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली.