Maharashtra Politics Pravin Darekar : शिवसेना अथवा उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्याबाबत काळजी व्यक्त करणारे एकही वक्तव्य देण्यात आले नाही. संजय राऊत हे शिवसेनेचे नेतेचे नव्हे इतका विसर उद्धव ठाकरे यांना पडला असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला. शरद पवार यांनीही संजय राऊत यांच्याबाबत भाष्य केले नसल्याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले आहे. 


भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर हे सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडले असल्यासारखे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून वर्तवणूक सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेच्या आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आता उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच राहिले नसून बुडत्याला काडीचा आधार लागतो. त्याप्रमाणे मिळेल तो आधार घेण्याचा ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला. ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी हिंदुत्वावर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या आणि इतर संदर्भात वादग्रस्त भूमिका घेतल्या, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यावरून उद्धव ठाकरे यांना अजूनही काहीच समजत नाही हे दुर्दैव असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 


अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले असले तरी आयकर विभाग त्यांचे काम करेल असे दरेकर यांनी सांगितले. मुंबई जिल्हा सहकारी बँकेने पाटील यांच्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांना कर्जे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.  पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून 25 ऑगस्ट रोजी छापेमारी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत पाटील कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. 


पवार कायद्यापेक्षा मोठे नाही 


सध्या रोहित पवार यांची चौकशी सुरु असली तरी हे पवार हे काय कायद्यापेक्षा मोठे नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. पवार यांना कायद्यानेदेखील अपवाद दिला नाही. त्यामुळे त्यांचीदेखील इतरांप्रमाणे चौकशी होणार असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला. ज्यांच्या चौकशीत काही आढळत नाही, त्यांना तपास यंत्रणा सोडून देते असेही त्यांनी सांगितले.