APMC Election 2023 Result : राज्यात झालेल्या बाजार समितीचे निकाल आज समोर आले असून, सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) निकाल देखील जवळपास स्पष्ट झाले आहे. ज्यात पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या तीनही बाजार समितीवर भाजपने (BJP) विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर कुर्डुवाडी राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात गेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील एकूण 48 जागांपैकी भाजपाला 30 तर राष्ट्रवादीला 18 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आज झालेल्या बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये सर्वच सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजार समितीमध्ये दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम ठेवल्याने परिवर्तनाच्या तयारीत असणाऱ्या विरोधकांच्या पदरी निराशाच पडली आहे. 


पंढरपूर बाजार समिती: जवळपास 500 कोटींची उलाढाल असणारी आणि बेदाणे व डाळिंबाच्या सौद्यासाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पंढरपूर बाजार समितीमध्ये भाजपचे माजी आमदार प्रसह्णत परिचारक यांनी सर्व 13 जागांवर एकतर्फी विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे. परिचारक गटाच्या 5 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने आता सर्व 18  जागा या भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. 


कुर्डुवाडी बाजार समिती: माढा तालुक्यातील कुर्डुवाडी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे बंधू आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनेलने सर्व 17 जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. या बाजार समितीमधील 1 जागा यापूर्वीच राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकली असल्याने कुर्डुवाडी बाजार समितीच्या सर्व 18 जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल्या आहेत. कुर्डुवाडी बाजार समितीमध्ये बोर, डाळिंब सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात.


अकलूज बाजार समिती: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकलूज बाजार समितीमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील यांनी सत्ता राखली आहे. मात्र एक जागेवर मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे उत्तम जाणकार निवडून आल्याने मोहिते पाटील गटाला धक्का बसला आहे. अकलूज बाजार समितीत सत्ताधारी भाजपाला 17 जागा तर, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागेवर विजय मिळाला आहे. 


मंगळवेढा बाजार समिती: तर काल झालेल्या मतमोजणीत यापूर्वीच भाजप आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा बाजार समितीच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी मोठा विजय मिळविलेला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या आत्तापर्यंत झालेल्या 4 बाजार समितीमध्ये भाजपने मंगळवेढा, पंढरपूर आणि अकलूज या तीन बाजार समितीवर सत्ता आणली आहे.  तर राष्ट्रवादीने कुर्डुवाडी बाजार समितीवर सत्ता राखली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 
Beed News : धनंजय मुंडेंचा बोलबाला तर पंकजा मुंडेंना धक्का; पाहा बीड जिल्ह्यातील बाजार समितीचे संपूर्ण निकाल