सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Election) हा भाजपासाठी एकतर्फी वाटत असतानाच आता विद्यमान खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्या विरोधात उमेदवारीसाठी दुसरे ताकतवर उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी दंड थोपटल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे .
टेम्भूर्णी येथे येथे सकाळी अकरा वाजता भाजप निरीक्षक केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत सर्व तालुक्यातील भाजप आमदार, पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक बंद खोलीत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप आमदार जयकुमार गोरे , आ रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यादरम्यान, विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असे दोन प्रमुख गट पडल्याचे दिसत होते. दिवसभरात या दोन्ही निरीक्षकांनी जवळपास 140 प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून अहवाल बनविला. यावेळी बोलताना निरीक्षक भागवत कराड यांनी या मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोनच प्रमुख उमेदवार असून इतर दोघांनीही उमेदवारीसाठी मागणी केल्याचे सांगितले.
उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणार
ज्याला पक्ष उमेदवारी देईल तो उमेदवार असेल असे दुसरे निरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपमध्ये कोणतेही वादविवाद नसून आपण निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांशीही चर्चा केल्याने ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम दुसरा करेल असे लाड यांनी सांगितले.
रणजित निंबाळकरांची सावध प्रतिक्रिया
एकाबाजूला निरीक्षक पक्षात कोणतेही वादविवाद नसल्याचे सांगत असले तरी दोन्ही गटाकडून आपल्या उमेदवारालाच तिकीट मिळणार याची खात्री दिली जात होती. यावेळी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया देताना मी पक्ष बैठकीला आलो होतो असे सांगत आपण उमेदवार म्हणून आलो नसल्याचा बॉम्ब टाकला. मात्र लगेचच पक्ष विचार करून उमेदवारी देईल असे सांगत आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे संकेत दिले.
आमदार निंबाळकरांच्या पाठिशी
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या दौऱ्यात खासदार रणजित निंबाळकर हे देशातील टॉप टेन खासदारांमधील असल्याचे सांगितले होते. खासदार निंबाळकर हे संपूर्ण मतदारसंघात लोकप्रिय असून पाण्याच्या फार मोठ्या योजना मार्गी लावल्याने सांगोला, माढा, करमाळा, माण खटाव येथील आमदारांनी उघड निंबाळकर याना समर्थन दिले आहे.
पक्ष आमच्या पाठिशी, मोहिती पाटलांचा दावा
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा केला. 2014 साली तत्कालीन राष्ट्रवादी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जी कामे सांगितली ती झाली. यामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रवेश करून माढा लोकसभा राष्ट्रवादीच्या ताब्यातून काढून भाजपाला मिळवून दिली असल्याचे सांगितले. मोहिते पाटील यांच्या बाबत भाजप अतिशय सकारात्मक असून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेलाही फडणवीस यांनी निधी दिल्याने भाजप आमच्यासोबत असल्याचा विश्वास मोहिते पाटील याना आहे.
विद्यमान खासदारांना मतदारसंघात मोठा पाठिंबा असताना त्यांच्या विरोधात मोहिते पाटील उभे ठाकल्याने भाजप समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मोहिते पाटील हे गेली 50 वर्षे सोलापूर जिल्ह्यातील एक ताकतवान घराणे असून प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलणे भाजपाला परवडणारे नाही. अशावेळी आता माढा लोकसभा मतदारसंघाचा काय अहवाल दिला जाईल त्यावर उमेदवारी ठरणार आहे.
माढ्यातून भाजपने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी दुसऱ्या इच्छुकाची नाराजी दूर केल्यास ही निवडणूक भाजपाला सुकर होणार आहे. सध्या तरी माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला असून येथील नाराजी भाजपाला लवकरात लवकर दूर करावी लागणार आहे.
ही बातमी वाचा: