सोलापूर : विशाळगडच्या पायथ्याला झालेली घटना अतिशय गंभीर असून पायथ्याशी असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने तेथील धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. तेथील लोकांची घरदारं फोडून तिजोरी लुटून त्यातील संपत्ती नेण्यात आली, हे शिवप्रेमीचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठून तरी आलेल्या ठिकाणावरून हे गुंड आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशातील जयंत पाटील यांनी केली. 


खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत


जयंत पाटील विशाळगड हिंसाचारावर संताप व्यक्त करताना म्हणाले की जर अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली, तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचं हे मोठं अपयश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जयंत पाटील यांनी वाघनखांवरूनही सुद्धा महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत. मात्र, लंडनवरून आणलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? अशी विचारणा त्यांनी केली. 


ती वाघनखं मागच्या दारांनी पोहोचली देखील आहेत. मात्र, वास्तविक मुंबईपासून साताऱ्यापर्यंत या वाघनखांचे स्वागत करायला हवे होते. साताऱ्यात ज्या वस्तूसंग्रहालयात उद्धघाटन सरकार करणार आहे त्याला सरकारने तिकीट लावल्याचे पाटील म्हणाले. सरकारने वाघनखं भाड्याने आणली असून ती वाघनखं मिळवलेली नाहीत, ती तात्पुरत्या स्वरूपात आणली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार?


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे जीआरवर बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला, तर उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधून काय आश्वासन दिलं आहे ते माहिती नाही. यावर सरकारने बऱ्याच चर्चा केल्या आहेत. त्यामुळे सरकारने निर्णयापर्यंत यायला हवं. सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांनी विरोधकांना बोलवून काय निर्णय घेतला हे सांगितले पाहिजे. चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार? असे विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या