Ashadhi Wari Health News : पंढरीच्या वाटेने चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी  या उपक्रमाने यंदा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. आषाढी यात्रा काळात एकादशी पर्यंत 13 लाख 96 हजार 72 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण केली असून आरोग्य विभागाने आपलाच गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितले.


आषाढी एकादशीनिमित्त यंदा पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला होता. लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून पंढरपूरी आले होते. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर विठ्ठल्लाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम सुरु केला होता. या अंतर्गत भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यंदा या आरोग्य शिबिरात लाभ घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झाली. 


आरोग्याची वारीचा आरोग्य विभागाने मोडला विक्रम


आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दुसऱ्या वर्षी नवीन विश्व विक्रम केला असून आजही मोफत तपासणी व उपचार सुरू असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अडीच लाख अधिक भाविकांनी या शिबिरातून आरोग्य तपासणी करून घेतली. आषाढी यात्रेत 11 लाख 64 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला होता .


आरोग्य विभागाने आपलाच गेल्या वर्षीचा विक्रम मोडला असून यावर्षी विक्रमी भाविकांच्या संख्येमुळे 65 एकर या भाविकांच्या निवास ठिकाणी चौथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते . या 65 एकर भागात 4 लाख भाविक निवासासाठी होते. त्यांनाही याचा मोठा फायदा झाला असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.


आषाढी वारीनिमित्त यंदा चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर


आषाढी सोहळ्यात गेल्यावर्षी महायुती सरकारने लाखो भाविकांसाठी 3 ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेत विक्रमी साडेअकरा लाख भाविकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम सुरु केला होता. गेल्यावर्षी भाविकांच्या उदंड प्रतिसादानंतर यंदाच्या आषाढी काळात तीन ऐवजी यंदा चार ठिकाणी हे महाआरोग्य शिबिरे भरविण्यात आले. गेल्या वर्षीच्या दीडपट भाविकांना आरोग्याची मोफत सेवा देण्याचा संकल्प केल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माझाशी बोलताना सांगितले.


गेल्यावर्षी अतिशय नाजूक तब्येत असणाऱ्या दीड हजार पेक्षा जास्त भाविकांना वेळेवर म्हणजे गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवता आले होते. त्याच पद्धतीने यंदा अगदी मंदिरात आणि नामदेव पायरी येथेही अत्यावश्यक उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.


हेही वाचा:


Ashadhi Wari : आषाढी वारीनिमित्त यंदा चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर होणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त उपचार होण्याची शक्यता