CM Eknath Shinde : लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काळजी करु नका. लवकरच याबाबत बातमी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 


गड किल्ल्यावर एकही अतिक्रमण ठेवणार नाही


केंद्रातले सरकार जाणार असे विरोधक म्हणत होते. मोदी हटाव म्हणायचे पण मोदी हटाने वाले हट गये मगर मोदी तो बैठ गये असेही मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीचे सरकारही पडणार म्हणायचे, पण मी दोन वर्ष काम केलं, पडलं का सरकार? विकासाच्या योजना आम्ही राबवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यावर एकही अतिक्रमण ठेवणार नाही. कुणावर ही सूडबुद्धीने कारवाई करणार नाही. ज्यांचे जुने अतिक्रमण आहे, त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. गडकोट किल्ल्यांचे पावित्र जपले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास करण्यासाठी गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ॲक्शन प्लॅन सरकार तयार करणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे


बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, सुखाचे समृद्धीचे आयुष्य येऊ दे असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. साडेसात एचपीपर्यंत कृषी पंप चालवतात त्यांना विजेचे बिल आपण माफ केले आहे. आपले सरकार हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नगरोत्थान योजनेसाठी 92 कोटी निधी दिला आहे. शहरातील 23 रस्त्यांसाठी 84 कोटी निधी दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तुळशी वृंदावनासाठी 20 लाख रुपये दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बेरोजगारांना 15 लाखांचे लोन सुरू केले आहे. वर्षाला 10 लाख मुलांना लाभ होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


तिरुपती धर्तीवर दर्शन मंडप योजना मंजूर 


वारीच्या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 20-20 तास रांगेत वारकरी असतात. त्यासाठी आता तिरुपती धर्तीवर दर्शन मंडप योजना मंजूर केली आहे. यासाठी 103 कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंढरपूरसाठी 1 हजार बेडचे हॉस्पिटल देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मी जे बोलतो ते करतो, आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते असा टोलाही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. दूध , सोयाबीन , कांदा , कापूस हे सर्व विषय भविष्यात सोडवायचे आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


शेवटपर्यंत जनतेच्या भल्यासाठीच काम करणार


रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेच्या भल्यासाठीच काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जे समाजात विष पसरवण्याचे काम करतात त्यापासून सावध राहावे लागेल असेही ते म्हणाले. पंढरपूरसाठी मोठा आराखडा तयार करावा लागेल, यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊ असंही त्यांनी सांगितलं. परत जाताना सुरक्षित वारी संपवून पोहोचा, तेव्हाच आम्ही समाधानी होऊ असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली