सांगोला: महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील आमदारांच्या आणि काही मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, त्यावरून पुन्हा एकदा मतभेदाच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत भाजप आणि शिंदे सेनेतील मतभेद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे 25 आमदार आणि माजी आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत काही शिवसेना नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना बाजूला केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशातच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या बैठकांना असलेली गैरहजेरी, नाशिकचा दौरा या सर्व घडामोडींमुळे पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस यांच्यात धुसफूस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, यादरम्यान शिवसेनेच्या एका आमदारांने या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सारवासारव केल्याचं दिसून येत आहे. 

धुसफूस ही फक्त माध्यमांनी तयार केलेली 

राज्यातील आमदारांचे वाय दर्जाचे संरक्षण कमी केल्यानंतर पुन्हा महायुतीत वादाला तोंड फुटणार अशी शक्यता सुरू झाली होती. शिंदे आणि फडणवीस यांच्यातील धुसफुस हे देखील वारंवार समोर येऊ लागली असताना आज शिंदेंचे कट्टर समर्थक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी या सर्व वृत्ताचे खंडन केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेली धुसफूस ही फक्त माध्यमांनी तयार केलेली असून दोघेही एक दिलाने राज्याच्या विकासाची कामे झपाट्याने करीत असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. 

सुरक्षेबाबत शहाजी बापू पाटलांची सारवासारव

राज्यातील आमदारांची काढलेल्या सुरक्षेबाबत ही अनेक बातम्या समोर येत असल्या तरी राज्यात ज्यावेळी प्रचंड उलथापालथ सुरू होती, तेव्हा विशिष्ट परिस्थितीत हे संरक्षण आमदारांना देण्यात आले होते. यानंतर परिस्थितीत अनेक बदल घडत गेले आणि गृह विभागाच्या नियमाने आता हे संरक्षण कमी केले आहे. मात्र, अजूनही ज्या आमदारांना किंवा नेत्यांना सुरक्षेची गरज आहे. त्यांना सरकार पुन्हा पोलीस संरक्षण पुरवेल असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शहाजी बापू पाटलांची वाय दर्जाची सुरक्षा काढली

वास्तविक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनाही वाय दर्जाची सुरक्षा होती. सध्या ही सुरक्षा काढून घेण्यात आली असून संरक्षणासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करण्यात आला आहे. असे असतानाही शहाजीबापू पाटील यांनी गरज भासल्यास पुन्हा संरक्षण मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या या संरक्षण कपातीवरून शिंदे गटाचे अनेक आमदार व नेते आक्रमक झाले असताना शहाजी बापूंनी मात्र गरज असणाऱ्यांना सरकार संरक्षण देईल असे सांगत शासनाची बाजू सांभाळून घेतली आहे.

कोणाची सुरक्षा कपात? कोणाची जैसे थे?

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली नाही. कपात केलेल्यामध्ये शिवसेनेचे माजी मंत्री आणि माजी आमदार यांचा समावेश आहे. ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षितता कमी करण्यात आली आहे. मंत्र्यांना दिली गेलेली सुरक्षा कायम आहे.

सुरक्षा कमी करण्यात आलेल्या कमी करण्यात आलेल्यांची नावं 

शिवसेना 

1) माजी मंत्री- दिपक केसरकर2) माजी मंत्री - तानाजी सावंत3) माजी मंत्री - अब्दुल सत्तार 4) सुहास कांदे5) अभिजित अडसुळ 6) प्रकाश सुर्वे7) शहाजी बापू पाटील

भाजप

1) प्रतापराव चिखलीकर2) रविंद्र चव्हाण3) सुरेश खाडे 4) गडचिरोली माजी आमदार देवराव होळी5) आरमोरीचे माजी आमदार कृष्णा गजबे