सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात वाळू माफीयांची कोणतीही दादागिरी चालू देणार नाही. त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होईल आणि त्यांना पाठीशी घालणारे कोणतीही राजकीय शक्ती असली तरी त्याचा विचार केला जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा वाळू माफी यांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांनी नाव न घेता रामराजे निंबाळकर यांना त्यांच्या एका पोस्टवरून डिवचलं आहे. माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, आमच्या भागात एकाने ट्विट करत, सुरुवात तुम्ही केली. आता शेवट मी करणार असा मेसेज सोशल मीडियात दिल्याचे मला पाहण्यात आले होते. म्हणून मी त्यांना एवढेच सांगेन की, सुरुवात ही तुम्हीच केली आणि तुमच्या कर्माने व नियतीने तुमचा शेवट केला, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता दिला आहे. काही दिवसापूर्वी रामराजे निंबाळकर यांनी अशा पद्धतीचे एक ट्विट केले होते ज्याला जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना थेट उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणालेत जयकुमार गोरे?
मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो,या जिल्ह्यामध्ये कोणत्याही वाळू तस्कराची मस्ती चालू देणार नाही. या जिल्ह्यात वाळूच्या बाबतीत जो अधिकारी त्याला मदत करेल त्याच्यावर देखील कारवाई होईल, कोणत्याही किमतीवर वाळू चालू देणार नाही. त्याचबरोबर वाळू माफीयांची दादागिरी कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. त्यामध्ये कोणतीही राजकीय शक्ती आडवी आली तरी देखील एकणार नाही. साताऱ्यातील एक ट्विट माझ्या वाचणात आलं होतं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, सुरूवात त्यांनी केली आहे. शेवट आम्ही करू, सुरूवात तर त्यांनीच केली होती. आता शेवट नियतिने केला आहे. आता नियतीने ठरवलं आहे, त्यांचा शेवट करायचा आम्हाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माला आणि नियतीला दोष द्यावा असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
जिल्ह्यात विकासाची आणि पक्षाचीही घडी...
पालकमंत्री जयकुमार गोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री (Solapur Guardian Minister) भाजप पक्षाने फार विचारपूर्वक केले आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या खांद्यावर सोपवलेली कामे पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सोलापूर जिल्ह्यात विकासाची आणि पक्षाचीही घडी पुन्हा बसवायची आहे. म्हणजेच माढ्यात लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा खासदार करण्यासाठीच ही नेमणूक असल्याचे गोरे यांनी अप्रत्यक्ष सांगितले आहे.