Pandharpur Rains : पुणे आणि सातारा परिसरात सुरु असलेल्या परतीच्या पावसाळे उजनी धरण (Ujani Dam) आणि वीर धरण (Veer Dam) ओव्हरफ्लो झाले असून उजनीतून भीमा नदीत 70 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 35 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पंढरपूर (Pandharpur) शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या चंद्रभागेतून हा 1 लाख 5 हजार क्युसेक विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार असून चंद्रभागेतून 1 लाख 10 हजार क्युसेक विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण, बडवे चर या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात होते. याच्यासोबत सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे सारख्या ग्रामीण भागातील आठ गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासाठी प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांना पुनर्वसन करण्याची तयारी ठेवली आहे.
उजनी, वीर धरण 100 टक्के भरलं; चंद्रभागेचं पाणी नदीकाठच्या मंदिरांमध्ये, देव हलविण्यास सुरुवात
पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या तीरावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. सध्या प्रशासनाने कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आहे.
राज्यभर मुसळधार पावसाची हजेरी
मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे.