सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या टप्पा अनुदान आवक जावक नोंदवही गहाळप्रकरणी माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण या तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह सुरेश किसन देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ या प्रमुख लिपिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.


तत्कालीन शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण यांच्या कालावधीतील कॅम्पमध्ये शाळांच्या टप्पा अनुदानास वैयक्तिक मान्यता देण्यात आले होते. परंतु, या प्रकरणाच्या चौकशीत त्या कालावधीतील कॅम्प नोंदवही, आवक जावक नोंदवही- शिक्षणाधिकारी कार्यालयात आढळत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात पाच तत्कालीन शिक्षणअधिकाऱ्यांची चौकशी झाली होती. मात्र, चौकशीत पदभार घेताना कोणत्या नोंदवह्या घेतल्या, बदलीनंतर कोणत्या नोंदवह्या पदभार घेणाऱ्यांना दिल्या, आवक जावक आणि कॅम्प नोंदवहीची पदभार नोंदवहीत नोंद आढळली नाही. 


त्यामुळे, यातील संशयित पाच तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन तत्कालीन लिपिकांच्या कालावधीत पदभार देता आणि घेतावेळी शाळांच्या टप्पा अनुदानाची आवक जावक नोंदवही जाणीवपूर्वक नष्ट केली. अथवा निष्काळजीपणाने गहाळ केल्याचा ठपका या चौकशीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठाच्या आदेशानुसार उपशिक्षणाधिकारी नाळे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005  मधील कलम 8 आणि 9 अन्वये 8 जणाविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 


 वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई...


एकीकडे शिक्षण क्षेत्रात अशी कारवाई झाली असतानाच दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीप्रसंगी एक वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी रजेवर गेल्याचे आढळून आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा नोंदवहीचा पत्ताच नसल्याने दिसून आले. या कारणावरून तेथे कार्यरत असणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रशासकी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तर तिन्हे प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या मटकीला जाळ्या लागल्याचे आढळून आले. या कारणावरून त्याही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


पंढरपूर तालुक्यातील शाळांची जिल्हा न्यायाधीशांमार्फत तपासणीला सुरुवात, ग्रामीण भागातील पालकातून समाधान