Solapur News : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती (Vitthal Rukmini Temple Committee) बरखास्त करुन चौकशी करा, अन्यथा सोलापुरात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी राज्य सरकारला दिला. अनेक आरोपांनी वादग्रस्त ठरलेली आणि दोन वर्षे मुदत संपूनही अजून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यरत आहे. त्यामुळं ही समिती तातडीनं बरखास्त करुन त्यांची चौकशी सुरु करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी देशमुखांनी केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांनी (19 जानेवारी) सोलापूरला येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना आम्ही  काळे झेंडे दाखवून राज्य सरकारचा निषेध करु असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला. मंदिर समितीच्या बारखास्ती आणि चौकशीसाठी प्रभाकर देशमुख आणि अॅड दत्तात्रय खडतर यांनी नामदेव पायरीजवळ मंदिराला लोटांगण घालून प्रदक्षिणा करीत निषेध आंदोलन केले. गेल्या 17 दिवसापासून प्रभाकर देशमुख आणि खडतर याच मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करत आहेत. शासनाने त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष न दिल्याने देशमुख आज आक्रमक झाले. त्यांनी वारकऱ्यांच्या सोबत आधी नामदेव पायरीजवळ भजन करून मग मंदिर समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी इशारा देताना ही समिती तातडीने बरखास्त करून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. 


विठ्ठल रुक्मिणी मुक्तिदिन साजरा


आज विठ्ठल मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून मुक्त होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. भारत पाटणकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मुक्तिदिन साजरा केला होता. बडवे उत्पात गेले तरी आरोप सुरूच असल्याबाबत बोलताना आता दुहेरी लढाई लढावी लागणार आहे. मंदिरातील भ्रष्टाचाराबाबतही आता रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे . मंदिर अजून 75 टक्के मुक्त झाले असून जोपर्यंत देवाची आरती पुरुषसुक्त वर केली जाते तोपर्यंत जातिव्यवस्थेची उत्तरण संपणार नाही असे सांगत देवाची आरतीही म्हणणे बंद करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय आता सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा मंदिर सरकारच्या ताब्यातून काढण्यासाठी उलटे चक्र फिरवत असून आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढून त्यांचा पराभव करु असेही डॉ पाटणकर यांनी सांगितले . 


एकाबाजूला प्रभाकर देशमुख यांचे मंदिर परिसरात आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल मुक्तिदिन यामुळे आज मंदिर परिसर गजबजून गेला होता . मात्र मंदिर समिती बारखास्ती आणि चौकशीसाठी प्रभाकर देशमुख यांनी पंतप्रधान मोदी याना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क बनले आहे . 


महत्वाच्या बातम्या:


Pandharpur: विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून पुन्हा गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने अथवा वस्तू गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा