पंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना (Maratha Reservation) येथे सुरू असलेल्या आंदोलनावर गुरुवारी (14 सप्टेंबर) रोजी तोडगा काढण्यात आला. पण आता धनगर (Dhangar) समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाजाकडून माळशिरस येथे रास्ता रोको (Rasta Roko) करण्यात आले. यामुळे पुणे, सातारा, पंढरपूर मार्ग हा दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आला होता. माळशिरस येथे अहिल्यादेवी चौकात धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलं. यासाठी मोठ्या संख्येने धनगर समाज अहिल्यादेवी चौकात जमला होता.
आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी
यावेळी धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आंदोलनात हजेरी लावली. चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचं यावेळी माजी आमदार रामहरी रूपावर यांनी सांगितले . त्यामुळे आता मराठा समाजानंतर धनगप समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायाला मिळत आहे.
धनगर समाजाची नेमकी मागणी काय?
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गातील घटनेच्या शेड्युल दोनमध्ये 36 नंबरवर समावेश आहे. पण अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची धनगर समाजाकडून मागणी होत आहे. तर या प्रर्वगातून आरक्षण मिळवे यासाठी एक शिफारस केंद्र सरकारला करणं बाकी असल्याचं रामहरी रुपावार यांनी सांगितलं. याशिवाय महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एनटी प्रवर्गात दिलेल्या आरक्षणाला 29 मे 2017 रोजी काढलेल्या एका जीआरमुळे अडचण निर्माण झाली. त्यामुळे ते आरक्षण देखील मिळणं आता बंद झाल्याचं रुपावार यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलतांना रुपावर यांनी म्हटलं की, 'राज्य सरकार ना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शिफारस करतयं, ना बंद पडलेलं एनटी आरक्षण सुरु करत आहे. त्यामुळे हा धनगर समाजावर मोठा अन्याय होतोय. आता न्याय मिळण्यासाठी धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली आहे.' तर माळशिरस येथील तहसीलदार यांना धनगर समाजाच्या वतीने मागण्यांचे निवदेन देत हे रास्ता रोको संपवण्यात आले.
मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात आले. तर सध्या धनगर समाजाकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला राज्य सरकार किती गांभीर्याने घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर धनगर समाजाकडून कोणती पावलं उचलली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
Maratha Reservation : जरांगेंच्या मागण्या काय होत्या? अन् कोणत्या मागण्या मान्य झाल्या?