Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar, Solapur : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण होण्याबाबतच्या बातम्या सुरू असताना माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केलीये. "2009 पासून 2024 पर्यंत अनेकजण कात्री घेऊन बसले होते. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची वाट लागली. अख्ख्या राष्ट्रवादीची वाट लावली", असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

अनेक जण कात्री घेऊन बसले, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली : मोहिते पाटील 

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली. यामुळेच आम्ही शरद पवार यांच्यापासून दूर गेलो होतो. मात्र नंतर जयंत पाटील यांच्यामुळे जवळ येण्याची संधी मिळाली. आम्ही परत आलो आणि आज सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे शरद पवार गटाचे त्यामुळेच निवडून आले, असंही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले होते.

अजित पवारांमुळे मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्याच्या चर्चा

मोहिते पाटील यांचे पंख कापण्याचे काम अजितदादा पवार यांच्याकडून होत असल्याच्या चर्चा होत्या आणि यातूनच मोहिते पाटील हे 2019 ला भाजपमध्ये गेले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करीत खासदारकी मिळवली होती. आता पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्यावर खासदार मोहिते पाटील यांचे आलेले वक्तव्य शरद पवार पक्षाला विचार करायला लावणारे असणार आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. भाजपने त्यावेळचे विद्यमान खासदार असलेल्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोहिते पाटील नाराज झाले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभेच्या तोंडवर भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांनीही त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत जवळपास 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुढच्या महिन्यात रिंकू राजगुरुचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मराठीतील दिग्गज स्टारसोबत झळकणार

मोठी बातमी : सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं, काय घडलं?