Pandharpur Chandrabhaga River News : उजनी धरण ओव्हरफ्लो (Ujani dam overflow) झाल्यानं चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) दीड लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळं पंढरपुरात (Pandharpur) पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. अशातच प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही भाविकाने स्नानासाठी नदीपात्रात उतरु नये असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, तरीदेखील भाविक धोकादायक पात्रात स्नानासाठी उतरत आहेत. प्रशासनाने मात्र, अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. सध्या श्रावण महिना सुरु असल्यानं हजारोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचत आहेत.
घाटाकडे डाणारे सर्व रस्ते बंद करणं आवश्यक, पण प्रशासनाने लावले केवळ बोर्ड
भाविक चंद्रभागेत स्तान करुनच विठ्ठल दर्शनासाठी जातात. मात्र, चंद्रभागेची पाणी पातळी वाढल्यानंतर सर्व घाटाकडे जाणारे रस्ते बंद करणे आवश्यक असताना प्रशासनाने केवळ बोर्ड लावून ठेवले आहेत. भाविक मात्र तसेच स्नानाला धोकादायक पात्रात उतरताना दिसत आहेत. सध्या पात्रातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याचा वेगही जास्त आहे. अशावेळी या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत प्रशासन मात्र अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. चंद्रभागेकडे जाणाऱ्या सर्व घाटांवर पोलीस, मंदिर समिती, नगरपालिका किंवा महसूल प्रशासनाने तातडीने कर्मचारी उभे करुन चंद्रभागा पात्रात उतरणाऱ्या भाविकांना रोखणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा पूरजन्य परिस्थितीत भाविकांबाबत कोणती दुर्घटना घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहणार आहे.
पंढरपूरकरांना थोडा दिलासा
पंढरपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. कारण, उजनी धरणात येणारा विसर्ग एक लाख 16 हजारपर्यंत कमी झाल्याने आता चंद्रभागेत सोडावा लागणारा विसर्ग सव्वा लाख वरुन कमी होण्याची शक्यता आहे. वीर धरणात येणारा विसर्गही मंदावल्याने वीर धरणातून सोडण्यात येणारं पाणीही कमी होणार आहे. त्यामुळं पंढरपूरमधील पूरजन्यस्थिती उद्यापर्यंत कमी होऊ शकणार आहे.
उजनी धरण 107 टक्क्यांपेक्षा जास्त भरले
आज सकाळी सहा वाजता उजनी धरण 107 टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे, सध्या धरणात 121 टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. सध्या उजनी धरणाकडे एक लाख 16 हजार विसर्गाने पाणी येत असून धरणातून भीमा नदीत सव्वा लाख क्युसिक विसर्गाने पाणी सोडणे सुरु आहे. पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने उजनीकडे येणारा विसर्ग कमी होऊ लागला आहे. आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिल्यास पंढरपूरचा धोका कमी होणार आहे. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरल्याने वीर धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग कमी होत आहे. वीर धरणाचा विसर्ग 23 हजारावरून 13 हजार करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ujani Dam: पंढरपूरसाठी महत्त्वाची बातमी, चंद्रभागा नदीचा पूर कधी ओसरणार? उजनी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करणार