पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बऱ्याच विरोधानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे. आज पहाटे फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर, एकदा विरोध झाल्याने फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानीच मध्यरात्री महापूजा केली होती. शिवाय आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा महापूजा झाली आहे.
अजितदादा महापूजेसाठी तीनवेळा विठ्ठल चरणी
यंदाच्या कार्तिकी एकादशीला महापुजेसाठी आमंत्रण देतांना मंदिर समिती चांगलीच अडचणीत आली होती. कारण सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्या उपमुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समोर आले. मात्र, यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना देखील कार्तिकीच्या महापुजेची संधी मिळालेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोरोना परिस्थितीतही दोनवेळा अजितदादा महापूजेला आले होते. तत्पूर्वी एकदा त्यांना संधी मिळाली होती. त्यामुळे आतापर्यंत तीनवेळा अजित पवार यांच्या हस्ते महापूजा झाली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा
वारीची ही प्रथा फार जुनी असून, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा (वार्या) पाहायला मिळतात. ज्यात, चैत्री यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्राचा समावेश आहे. दरम्यान, कार्तिकी यात्रा म्हणजेच कार्तिकी एकादशी ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. असे म्हणतात की, शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन पाहायला मिळतात. या काळात संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते, आणि एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. त्यानंतर पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या: