Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Sahakari Sakhar Karkhana Election) रंगात आली आहे. "आमच्या कारखान्याच्या काट्यात एक किलोचा जरी फरक पडला तर एक लाखाचे बक्षीस देऊ," असे जाहीर आव्हान कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिले. सध्या राज्यातील वजनकाट्याच्या बाबत काटामारीच्या आरोपामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. यातच याच मुद्द्यावर राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुण्यात भव्य मोर्चा काढल्याने कारखानदार बॅकफूटवर आले होते. अशावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी वजनकाट्याबाबत जाहीर आव्हान दिल्याने हा मुद्दा प्रभावी ठरु लागला आहे. कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही काट्यावर वजन चेक करुन भीमा कारखान्यावर आणावा आणि आमच्या काट्यावर एक किलो जरी वजन कमी भरले तर एक लाखाचे बक्षीस देऊ ही भूमिका शेतकरी सभासदांना भुरळ घालू लागली आहे. 


गेल्या दहा वर्षांपासून या कारखान्यावर खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असून यंदाही भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांचे नेते महाडिक यांच्या स्टेजवर आल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र आहे. धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हेही आपल्या खास शैलीत सभा गाजवत आहेत. चोख वजनकाटा, ऊसबिले आणि जाहीर केलेला 2600 रुपयांच्या भावामुळे खासदार महाडिक यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


धनंजय महाडिक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील मैदानात उतरले असून आता भाजपचा परिचारक गट देखील राष्ट्रवादीच्या मदतीला धावल्याने या निवडणुकीतील रंगात वाढत चालली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर अतिशय टोकेरी भाषेत टीका सुरु असल्याने परिसरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनले आहे. या निवडणुकीत सुरुवातीला परिचारक तटस्थ भूमिकेत दिसत होते. भीमा कारखान्यावर परिचारक यांचीही मोठी ताकद असल्याने परिचारिकांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र काल रात्री पाटकूल येथील सभेत प्रणव परिचारक यांनी उपस्थिती लावल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दामाजीमध्ये भाजप आमदाराविरोधात भूमिका घेतल्यानंतर नंतर पुन्हा परिचारक गटाने भाजप खासदार विरोधी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमचा गट आणि कार्यकर्त्यांच्या भावना सांभाळण्यासाठी आम्हाला सहकारात ही भूमिका घ्यावी लागल्याची परिचारिकांची भूमिका आहे.