सोलापूर : लावणी आणि तेही महिला पाहताना असे दुर्मिळ चित्र फार क्वचित पाहायला मिळते . बारा महिने आधी चूल आणि मुलं नंतर संसाराचा गाडा ओढण्यात अडकून पडलेल्या ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून चक्क लावणी स्पर्धेच्या कार्यक्रमाला येण्याची संधी अकलूजकरांनी (Lavani Mahotsav Akluj) आणली . यास या ग्रामीण भागातील महिलांनी नुसता उदंड प्रतिसाद दिला नाही तर संपूर्ण कार्यक्रम एन्जॉय केला .
लावणी ही पुरुष रसिकांची मक्तेदारी मनाली जात होती . पण आज आम्हाला लावणी नेमकी काय असते हे पाहायलाही मिळाले आणि त्याचा आनंद देखील घेता आला अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
सहा वर्षानंतर पुन्हा एकदा लावणी महोत्सव सुरू
प्रसंग होता अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचा, या स्पर्धेच्या आयोजक स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी सहा वर्षांपासून बंद पडलेला हा कार्यक्रम यावर्षीपासून पुन्हा सुरु केला आणि पहिल्या दिवशी खास महिलांसाठी सलग दोन कार्यक्रम घेतले. अकलूजच्या लावणी स्पर्धेने गेल्या 30 वर्षात शेकडोंच्या संख्येने आघाडीचे लावणी कलावंत दिले. अगदी अलीकडची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच अकलूज लावणी स्पर्धेपासून केली होती.
जंगी कार्यक्रमाची आखणी
या स्पर्धेमुळे अनेकांना चित्रपटसृष्टीत अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली तर अनेक कलावंतांचे शो अगदी अमेरिकेपर्यंत होऊ लागले होते. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा बंद झाली आणि लावणी कलावंत बनविण्याची फॅक्टरी बंद पडली होती. यामुळे गेल्या सहा वर्षात नवीन कलावंतांना सतेज मिळू शकले नव्हते. आता आजपासून सुरु झालेल्या या लावणी स्पर्धेत अनेक नवोदित लावणी कलावंत विविध पार्ट्यामधून आपली कला सादर करणार आहेत .
गुरूपासून पुन्हा अकलूज मध्ये घुंगुरांची छमछम , धोलकीची कडकडाट घुमली असून आजच्या पहिल्या दिवशी महिला कलावंतांना महिला रसिकांची उस्फुर्त दाद मिळाली . शुक्रवारपासून तीन दिवस या राज्यस्तरीय लावणी स्पर्धा होणार असून या तीनही दिवसांची सर्व तिकिटे राज्यभरातील लावणी रसिकांनी महिन्यापूर्वीच बुक केली आहेत. या लावणी स्पर्धेसाठी पाहिले बक्षीस 5 लाख रुपये असणार असून राज्यातील सर्व आघाड्याच्या कलाकारांच्या पार्ट्या यात सहभागी झाल्या आहेत .