सोलापूर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawale) तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर ऊर्फ शेखर  देशपांडे (Shridhar Deshpande) यांच्यावर आठ लाखांची लाच (Bribe) मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. आता जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे (ACB) पथक दाखल झाले असून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. 


अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. लिपिक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. 


स्वीय सहाय्यकाकडे सापडलं मोठं घबाड


त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 93 हजार रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळून आली आहेत. ही मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे आढळली आहेत. तसेच बीड जिल्ह्यात देखील शेत जमीन खरेदी केल्याचे दिसून येत आहे. तसेच एक चारचाकी वाहन, दोन इलेक्ट्रॉनिक मोपेड मोटार सायकल, दोन मोटार सायकलही आढळून आल्या आहेत. 


जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल


लाच प्रकरणात फरार असलेले अहमदनगरचे आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले.  सोलापुरातील विद्या नगर परिसरात पंकज जावळे यांचे घर असून मागील चार वर्षांपासून इथे कोणीही राहायला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  पंकज जावळे हे अहमदनगर आयुक्त होण्यापूर्वी सोलापुरात जिल्हा प्रशासन अधिकारी उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी विज्ञानगर येथे पंकज जावळे यांचे घर होते. याच घरात एसीबी पथककडून चौकशी सुरु करण्यात आली. सोलापूर एसीबी विभागाचे 7 ते 8 अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले. या घरात घरगुती साहित्याशिवाय काहीही आढळून आलेले नाही, घर मात्र जावळे यांच्या मालकीचे आहे.  या संदर्भात आम्ही अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती एसीबीचे उपधीक्षक गणेश कुंभार यांनी दिली. 


जावळेंवरील कारवाईनंतर महापालिकेसमोर फोडले फटाके


दरम्यान, पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेसमोर एकमेकांना पेढे भरवून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. आयुक्त पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम व्यावसायिकांना त्रास दिला जातं असल्याचा आरोप होत आहे. 5-5 महिने कोणताही बांधकाम परवाना जाणून-बुजून देण्यात येत नव्हता. कारवाई झाल्यामुळे खरंच न्याय मिळाला, अशी भावना बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली. 


आणखी वाचा 


Tejas Garge : पुरातत्वचे लाचखोर संचालक तेजस गर्गेंचे निलंबन, राज्य सरकारची कारवाई