सोलापूर: रविवारी सायंकाळी सात वाजता फुटलेल्या जलसेतूचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर मंगळवारी या जलसेतूच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी लागणारे पॅकिंगचे रबर अहमदाबादवरून दुरुस्तीच्या ठिकाणी पोचले आहे. अत्यंत अवघड आणि जिकिरीचे हे दुरुस्ती काम असून मंगळवारी दुपारी या कामाला  सुरुवात झाली. 


एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर जलसंपदा विभागाला खडबडून जाग आली आणि तातडीने उजनी कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद केले. साधारण 40 मीटर उंचीच्या जलसेतूमधून धबधब्यासारखे पाणी कोसळत असल्याने या भागातील जमिनीला 15 फुल खोल खड्डा पडून येथील शेतजमीन पिके, मोटारी पाईपलाईन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचाही मोठे नुकसान झाले आहे. 


मंगळवारी दुपारी या 40 मीटर उंच आणि एक किलोमीटर लांब असलेल्या या जलसेतूमधील मॅनहोल मधून शिडीच्या मदतीने कामगार आत उतरले. जवळपास पाच मीटर व्यासाच्या या गोल पाईपमधील घाण आणि गाळातून कामगार आणि अभियंत्यांनी जिथे जलसेतूच्या जोडला गॅप पडला होता तेथे जाऊन दुरुस्ती कामाला सुरुवात केली. सुरुवातीला जुन्या खराब झालेल्या रबर पॅकिंगभोवती लावलेले काँक्रीट फोडून हे पॅकिंग मोकळे करून घेतले. या जोडला लागणारे रबर पॅकिंग अहमदाबादवरून आज या जलसेतूजवळ वाहनाने आणण्यात आले.


तब्बल 137 किलो वजनाचे हे रबर पॅकिंग उतरवून घेतल्यावर जुन्या आकाराच्या रबर पॅकिंगच्या मापाने नवीन पॅकिंग कापून हे या जलसेतूच्या जोडावर लावून कडेला जलद गतीने चिकटणार सिमेंट वापरून ते फिक्स करण्यात आले. आता हे जोडलेले पॅकिंग मजबूत होण्यासाठी आजचा दिवस ते तसेच ठेऊन बुधवारी पुन्हा पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे. या कामासाठी पाच ते सहा मजूरांनी सहा ते सात तास या पाईपमध्ये काम केलं. आत गुदमरू नये म्हणून जलसेतूची सर्व मॅन होल उघडण्यात आली होती. 
       
दरम्यान या सगळ्या प्रकारात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा याच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा युवा सेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांनी दिला आहे. जलसेतूला लागलेल्या गळतीबाबत इंगळे यांनीच तक्रार केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडे धाव घेतली. मंगळवारी दुरुस्तीला सुरुवात होताच इंगळे यांनी एबीपी माझाचे आभार मानत ऐन दुष्काळात होणारी लाखो लिटर पाण्याची नासाडी माझाच्या बातमीमुळे थांबल्याचे सांगितले. 


काही दिवसापूर्वी पटकुळ येथेही उजनीच्या कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचेही फार मोठे नुकसान झाले होते. यंदा उजनीचे पाणी पातळी अत्यंत झपाट्याने कमी होत असताना वारंवार कळवा किंवा जलसेतू फुटल्याने पाणी वाया जाणे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला परवडणारे नाही. जलसंपदा विभागाने अशा पद्धतीने वारंवार होत असलेल्या पाणी नासाडी रोखण्यासाठी कालवे आणि जलसेतूची वेळच्यावेळी निगा राखणे गरजेचे असल्याने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी इंगळे यांनी केली आहे. 


ही बातमी वाचा :