सोलापूर : जिल्ह्यातील उजनी धरणावर (Ujani Dam) असणारा उजवा कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे वास्तव्य 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आज रात्रीपासून या जलसेतूच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. सोबतच उजनी धरणातून उजव्या कालव्यात सोडलेले पाणी तातडीने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे आठ मिलीमीटर जाडीचे पॅकिंग रबर देखील पोहचले असून, आज रात्री या कामाला सुरुवात होणार आहे. तर, अत्यंत अवघड आणि जिकिरीचे हे दुरुस्ती काम असून, 40 मीटर उंचावरील जलसेतूत उतरून दुरुस्ती करावी लागणार आहे. 


सहा महिन्यापूर्वी 4 नंबर पाईप जोडाचे रबर तुटल्याने त्याहीवेळी लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आता त्याच्या पुढच्या म्हणजे 5 नंबरच्या पाईप जोडाचे पॅकिंग रबर तुटल्याने पुन्हा लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या धरणातून सोडलेले पाणी बंद केले असले, तरीही पूर्वीपासून आलेले जलसेतूमधील पाणी अजूनही धबधब्यासारखे उंचावरून कोसळत आहे. आज रात्रीपर्यंत हे पाणी थांबण्याची शक्यता असून, त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. 


जमिनीला 15 फुट खोल खड्डा...


विशेष म्हणजे, 50 वर्षांपूर्वी उभारलेले हे जलसेतूचे स्टक्चर जुने झाले आहे. कॅंटीलिव्हर पद्धतीच्या या जलसेतूमध्ये सातत्याने जाणवणाऱ्या हादऱ्यामुळे जोडाचे पॅकिंग रबर खराब होत असतात. दरम्यान, याबाबत 'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यानंतर जलसंपदा विभागाला खडबडून जाग आली आहे. त्यानंतरच तातडीने उजनी कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. जलसेतूमधून धबधब्यासारखे पाणी कोसळत असल्याने या भागातील जमिनीला 15 फुट खोल खड्डा पडून, येथील शेत जमीन, पिके, मोटारी, पाईपलाईन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


पॅकिंग मजबूत होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी


आज रात्री 40 मीटर उंच आणि 1 किलोमीटर लांब असलेल्या या जलसेतूमधील मुख्य हॉलमधून शिडीच्या मदतीने कामगार आत उतरतील. जवळपास 5 मीटर व्यासाच्या या गोल पाईपमधील घाण आणि गाळातून कामगारांसह अभियंत्यांना प्रवास करावा लागणार आहे. त्यानंतर जिथे जलसेतूच्या जोडाला गॅप पडला आहे, त्या 5 नंबर पाईपजवळ जाऊन दुरुस्ती कामाला सुरुवात होईल. सुरुवातीला जुन्या खराब झालेल्या रबर पॅकिंग भोवती लावलेले काँक्रीट फोडून हे पॅकिंग मोकळे केले जाईल. पुढे, जोडला लागणारे रबर पॅकिंग जलसेतूजवळ वाहनाने आणले जाईल. तब्बल 137 किलो वजनाचे हे रबर पॅकिंग उतरवून घेतले आहे. तसेच, आता जुन्या आकाराच्या रबर पॅकिंगच्या मापाने नवीन पॅकिंग कापून हे या जलसेतूच्या जोडावर लावून कडेला जलद गतीने चिकटणारं सिमेंट वापरून ते फिक्स केले जाईल. तर, जोडलेले पॅकिंग मजबूत होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर पुन्हा पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे. 


पाण्याची नासाडी 'माझा'च्या बातमीमुळे थांबली 


सध्या उजनी धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा आहे. अनेक दिवसाच्या मागणीनंतर कालव्याचे आवर्तन सुरु झाले होते. अजून पाणी उजव्या कालव्यावरील सर्व भागाला पोचण्यापूर्वीच जलसेतूचे रबर पॅकिंग फुटल्याने पाण्याचे आवर्तन बंद करावे लागले आहे. आता हे रबर पॅकिंग जोडल्यावर पुन्हा उजनी उजव्या कालव्याच्या हजारो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकणार आहे. मात्र, ऐन दुष्काळात होणारी लाखो लिटर पाण्याची नासाडी 'माझा'च्या बातमीमुळे थांबली असून, तातडीने प्रशासनाने पुढील कामाला सुरुवात केल्याने पुढील पाण्याची नासाडी टळली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Horse Market : देशातील पहिला घोडेबाजार भरण्यापूर्वीच 1 कोटींची विक्री; अकलूजच्या बाजारात 50 लाखांच्या कोब्राची चर्चा