Maharashtra Sindhudurg News: इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्गच्या (Sindhudurg News) वेंगुर्ले तालुक्यातील (Vengurla Taluka) यशवंत गडाला (Yashwant Gad Fort) अनधिकृत बांधकामामुळे (Unauthorized Construction) धोका निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर अनधिकृत बांधकाम सुरु आहे. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटनाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी तटबंदीजवळ उत्खनन करण्यात आलं आहे. तर समुद्रालगत सीआरझेडचं उल्लंघन करत आरसीसी पद्धतीचं बांधकाम सुरु आहे. सदर बांधकाम तात्काळ हटवावं, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.
यशवंतगडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका
इ. सन 610 ते 611 या कालखंडात चालुक्य राजाने रेडी येथे यशवंत गडाची निर्मिती केली होती. नंतरच्या काळात हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. या गडावर छत्रपती संभाजी महाराज येऊन गेल्याचं इतिहासकार सांगतात. अलिकडेच शासनाने या गडाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेतल्याने अनेक देशी-विदेशी पर्यटक या गडाला भेट देतात. अनेक इतिहासकार अभ्यासासाठी गडावर येतात. या गडावर मोठ्या प्रमाणात शिव उत्सवही साजरे केले जातात. मात्र याच इतिहासाची साक्ष देणाऱ्या यशवंतगडाला सध्या या अनधिकृत बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे.
पर्यटनाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आठ जलदुर्गांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीत करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचललं आहे. किल्ले संवर्धन समितीतर्फे केंद्र सरकारला लवकरच हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्या आठ जलदुर्गामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावातील यशवंतगडाचा समावेश आहे. कोकणात अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊल खुणा आहेत. राज्य संरक्षित स्मारक असलेल्या यशवंत गडाच्या पायथ्याशी पर्यावरणाचा ऱ्हास करत पर्यटनाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन सीआरझेड क्षेत्रात आरसीसी बांधकाम करण्यात येत आहे. त्या बांधकामामुळे यशवंतगडाचीची तटबंदी कोसळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :