Sindhudurg News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळच्या बाजूची काही माती काल खचली होती. सततच्या पावसामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याच्या बाजूचा जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली होती. ही बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जांभा दगड टाकून खचलेला भाग बुजवला आहे.
रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भराव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आला आहे. तर या खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पाहणी करणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण नियमानुसार सातत्याने करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज आज मालवण राजकोट किल्ला येथे पाहणी करून घटनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा सुरक्षित
दरम्यान, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सदर चबुतऱ्याला कोणतीही संरचनात्मक नुकसान झालेले नसल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. दि. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव काही प्रमाणात खचला होता. याचा चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
आणखी वाचा
Pune Train Fire: पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ