Shivendra Singh Rajebhosale : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या (Malvan Shivaji Maharaj Statue) चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती शिवेंद्रसिंह राजे यांनी दिली आहे.
शिवेंद्रसिंह राजे भोसले नेमकं काय म्हणाले?
पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं सांगितलं मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळील जमीन खचल्याचा विषय माझ्या कानावर आल्यानंतर मी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती घ्यायला सांगितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत पुतळ्याला किंवा पुतळ्याच्या चबुतऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पुतळ्याच्या आजूबाजूला जो भराव केला होता त्या काही भागातील माती पाऊस जास्त असल्यामुळे खचली आहे. त्या ठिकाणच्या तात्काळ दुरुस्तीच्या सूचना मी दिलल्या असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या संपूर्ण परिसरावर नीट लक्ष ठेवण्याच्या सूचना
आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कोकणात पाऊस जास्त असतो. तरीही पीडब्ल्यूडी च्या संबंधित अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या संपूर्ण परिसरावर नीट लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही याची खबरदारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेत आहोत. सर्व अधिकारी माझ्याशी बोलले आहेत पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्याच्या बाजू ला असलेली जमीन पावसाळ्याच्या जास्त प्रमाणामुळे पाणी झिरपल्यामुळे थोड्या प्रमाणात खचली आहे. आणि त्याचे दुरुस्ती तात्काळ आता सुरु केली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या आधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण त्या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तो 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 कोसळला. त्यावरून मोठं राजकारणही झालं. त्यानंतर महायुतीच्या सरकारने पुन्हा गाजावाजा करत मूळच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवला. हातातल्या तलवारीसह या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे. राजकोटवरील नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. आता महिनाभरातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली आहे. त्यामुळे पुतळ्याला लागूनच असलेली जमीन काही प्रमाणात खचल्याचं दिसून आलं. या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली.