Sindhudurg Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी (Vaibhavwadi) तालुक्यातील खांबाळे येथे एक दुर्दैवी रिक्षा अपघात झाला आहे. या अपघातात सोनाळी गावातील एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, रिक्षाचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुजल भोसले हे आपल्या कुटुंबातील पाच जणांना घेऊन रिक्षाने वैभववाडीहून फोंड्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, खांबाळे येथील आदिष्टी मंदिराजवळ रिक्षा अचानक झाडावर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात धडकली.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे
सुशांत भोसले
स्नेहांश भोसले (गंभीर जखमी)
स्वप्नील भोसले
सुजल भोसले (चालक)
योगेश भोसले
सोजवी भोसले
यामधील स्नेहांश भोसले, जो चालकासोबत पुढच्या भागात बसलेला होता, तो गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचारानंतर कणकवली आणि ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अपघात घडल्यानंतर खांबाळे गावातील तरुणांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी रिक्षामध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धावत्या स्कूल व्हॅनमधून तीन विद्यार्थी पडले
दरम्यान, अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून फातिमा स्कूलचे तीन विद्यार्थी खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्कूल व्हॅनचा चालक अंबरनाथच्या महामार्गावरून भरधाव वेगाने स्कूल व्हॅन घेऊन जात असताना मागचा दरवाजा अचानकपणे उघडला आणि त्यातून तीन विद्यार्थी खाली पडले. मात्र, या स्कूल व्हॅन चालकाच्या हे लक्षात आले नाही, त्यामुळे तो पुढे निघून गेला. जखमी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या