सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघा विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 109, 110, 125, 318, 3 (5) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा रजि.नं. 133/2024 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.


राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर आता पोलीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती कठोर कारवाई करणार, हे पाहावे लागेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने  पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. यावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची राळ उठवली आहे.


स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांनी आरोप फेटाळले


याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, मी संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले नव्हते. मी केवळ पुतळ्याच्या  चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होते. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असे चेतन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाण्यातील संबंधित कंपनीवर पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे बघावे लागेल.


सुप्रिया सुळेंचा रोख ठाण्यातील कंत्राटदाराकडे


शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी ठाण्यातील एका कंत्राटदाराचा उल्लेख केला होता. राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती.


या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केले होते. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे हे नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. 


आणखी वाचा


सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....