Sindhudurg News : राज्यात 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि चंद्रपूर (Chandrapur) या दोन जिल्ह्यांसाठी चांदा ते बांदा योजना आणली होती. या योजनेचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे होते. या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, मच्छिमार, कलावंत, उद्योजक या सर्वांनाच होत होता. त्यामुळे ही योजना तळापर्यंत पोहोचली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारं या योजनेतून मिळू लागली. मच्छीमारांना मासे टिकवण्यासाठीची सामग्री, बोटी, मच्छीमारी जाळी यासाठीसुद्धा लाभ होऊ लागला. तर आंबा बागायतदार आणि इतर उद्योजक यांना देखील या योजनेचा चांगला लाभ झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना तळागाळापर्यंत पोहोचली होती.


राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आलं आणि या या सरकारनं देवेंद्र फडणवीस यांची चांदा ते बांदा ही योजना बंद करून फक्त कोकणासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यासाठी रत्नसिंधू ही योजना आणली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चांदा ते बांदा ही योजना बंद करून त्या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी रत्नसिद्ध ही योजना घोषित केली. मात्र ती अमलात येईपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार कोसल आणि आता राज्यात शिंदे सरकार आलं. मात्र शिंदे सरकार आलं तरीदेखील रत्न सिंधू साठी अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या योजनेसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता त्यांनी रत्नसिंधूमध्ये चांदा ते बांदा योजनेचे पैसे खर्च करून काही काळातच पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही योजना कार्यान्वित करणार असल्याचे म्हटलं आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना रत्नसिंधू ही योजना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आणली होती. त्या योजनेला शिंदे सरकार ब्रेक देणार आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना एक धक्का मानला जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकण आहे आणि याच कोकणासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी चांदा ते बांधा ही योजनेला ब्रेक देऊन रत्नसिंधू ही योजना आखली. याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, मच्छीमाराने वर्ग, युवकांना होणार होता. मात्र सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या काळात झालेले निर्णय देखील बदलण्यात येत आहेत. यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी असलेली योजना चांदा ते बांदा पुन्हा एकदा कार्यरत करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात आहे.


चांदा ते बांदा ही योजना संपूर्ण राज्यासाठी आहे. पहिला टप्प्यात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश केला होता. मात्र टप्प्याटप्प्यानं त्या योजनेत राज्यातील इतरही जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रत्नसिंधू ही दोन जिल्ह्यांसाठी असणारी योजना बंद करून पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील योजना पुन्हा सुरू होणार आहे.