सिंधुदुर्ग : "यापुढेही मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करणार नाही. शिवाय यापूर्वी शरद पवार यांच्यावर एका शब्दाने जरी टीका केली असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केले आहे. 


आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर या पुढे कधीही टीका करणार नाही, असे म्हटले आहे. "शरद पवार हे माझ्या गुरु स्थानी आहेत. त्यामुळे काही झाले तरी त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यामुळे तसा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी कधीही त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. 


दीपक केसरकर म्हणाले, "शरद पवार यांच्यावर मी जे बोललो ती राजकीय वस्तुस्थिती होती. मात्र, कोणत्याही पद्धतीने मी त्यांच्यावर टीका केलेली नाही. काही जणांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर मी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे."


"आज बाळासाहेब ठाकरे असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवून घेऊन माझ्या वाघाने महाराष्ट्राचं सिंहासन जिंकलं म्हणून त्यांच्या डोक्यावर भगवा टिळा लावला असता. बाळासाहेब ठाकरे एक जगावेगळं0 व्यक्तिमत्व होतं, अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या. 


"लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सुपर सीएम असल्याच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. लोकांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहेत. हे सरकार अडीच वर्षेच नाही, तर पुढची पंचवीस वर्षे महाराष्ट्रात राहील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.  


"युतीचा धर्म पाळून उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे यासाठी प्रयत्न सुरू होते. वारंवार आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. परंतु, आता वेळ संपत आली आहे. आता मातोश्रीवर परत जाणे शक्य नसल्याचे सांगत त्यांना दिलेला अल्टीमेटम संपल्याचे दिपक केसरकर त्यांनी जाहीर केले. तसेच भाजप नेते नारायण राणे यांच्यावर मी कधीही व्यक्तिगत बोललो नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे टाळावे असे आमचे म्हणणे होते. तर दुसरीकडे त्यांची मुले माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे मी त्यांना लहान म्हटले होते. परंतु, तसे म्हणण्याचा त्यांना राग येत असेल तर यापुढे मी कुणावरही बोलणार नाही. जे कोणी माझ्या जिल्ह्यातील स्थानिक नेते टीका करत आहेत त्यांना मी उत्तर देणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी जाहीर केली. 


'अडीच वर्षात मतदारसंघातील कामे झाली नाहीत'
"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली चौकुळ गेळे या गावातील कबुलायदार जमिनीचा विषय गेले अडीच वर्ष पडून होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने सोडवणार असल्याचं कबूल केलं आहे. सहा महिन्यात सुटणारा प्रश्न गेले अडीच वर्ष अडकून पडला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून देखील आमच्या मतदारसंघातील कामं होत नव्हती. त्यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.  


महत्वाच्या बातम्या


मी प्रत्यक्ष नारायण राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी नाही, कारण तेवढा मी सिनियर : दीपक केसरकर