सिंधुदुर्ग : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उद्या होणाऱ्या निष्ठा यात्रेला सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या रॅलीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गवळी तिठ्या जवळ शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचं घर आहे. केसरकर यांच्या घरा समोरून आदित्य ठाकरे यांची रॅली जाणार होती. मात्र पोलिसांनी या र्रलीला परवानगी नाकारली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या बंडाळीनंतर आता आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेटी देत आहेत. उद्या आदित्य ठाकरे यांची ही निष्ठा यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे. या निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून रॅली निघणार होती. परंतु, प्रशासनाने त्यांच्या या रॅलीला परवानगी नाकारली आहे. 
 
"कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला परवानगी नाकारली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे गवळी तिठ्या ऐवजी आता चिटणीस नाका ते गांधी चौक अशी रॅली होणार असून गांधी चौकात आदित्य ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. 


आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्यापासून त्यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्यात ते प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.  1 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता कुडाळ येथे आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा होईल. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता सावंतवाडी येथे मेळावा होणार आहे.


शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा येणार असल्यामुळे शिवसैनिक कामाला लागले आहेत. बंडखोरी केल्यापासून दीपक केसरकर शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर मांडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरधात रोष आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांची रॅली उद्या केसरकरांच्या मतदारसंघातून निघताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे.