Lok Sabha elections 2024 Phase Three : देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. त्यातच कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (RatnagiriSindhudurg Lok Sabha) देखील मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) हे नॉट रिचेबल आहेत. परिणामी, त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्या, अशी आग्रही मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलीय.


तातडीने पोलीस संरक्षण द्या- वैभव नाईक


किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार  माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. तसेच अलिकडे दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात देखील बघायला मिळत आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे  किरण सामंत यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.


अनेक चर्चा अन् तर्कवितर्कांना उधाण


लोकसभा निवडणुकांसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय. राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात निवडणुकींचा सामना रंगताना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये मैदान मारण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.


अशातच कोकणात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून यंदा ठाकरे गटाने विद्यमान खासदार आणि निष्ठावंत शिवसैनिक विनायक राऊत यांना दिली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासमोर विनायक राऊतांचे सर्वात मोठे आव्हान आहे. या जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) या जागेवरून लढण्यास इच्छुक होते. पण नारायण राणेंनी (Narayan Rane) शेवटपर्यंत दावा सोडला नाही. अखेर उदय सामंत (Uday Samant) यांनाच माघार घ्यावी लागली आहे. अशातच आज सकाळपासून किरण सामंत (Kiran Samant) हे नॉट रिचेबल असल्याने अनेक चर्चा आणि  तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या