Eknath Shide Speech : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे तसंच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. शासन आपल्या दारी (Shasan Aapalya Dari) या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात (Sindhudurg) आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी काही योजनांची घोषणा केली.


सिंधुदुर्गात 'शासन आपल्या दारी'चा चौथा कार्यक्रम 


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरआहेत. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये दोन ठिकाणी विविध योजनेचा शुभारंभ आणि उद्घाटनांचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. तसंच शासन आपल्या दारी या योजनेतून विविध लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यासाठी लाभार्थ्यांची नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर झाली होती.


'मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करतोय'


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, " मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, नागपूर-मुंबई महामार्ग जसा केला तसाच प्रकारचा मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करत आहोत. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण प्राधिकरण बनवत आहोत. यामुळे कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळल्याशिवाय राहणार नाही. समृद्ध कोकण घडवण्यासाठी आपण प्रयत्न करु"


तसंच आता शासकीय कामांसाठी सतत शासनाच्या दारी खेटे मारावे लागणार नाहीत कारण सरकार तुमचं आहे. अनेक दाखले एकाच छताखाली देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.


'आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला'


जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. केंद्र सरकारचं देखील आम्हाला संपूर्ण पाठबळ आहे. सहकार क्षेत्र अडचणीत असल्याचं सांगितल्यानंतर दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्यात आला. हे डबल इंजिनचं सरकार आहे. मागील आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला आहे. आपण कर्नाटक आणि गुजरातला देखील यात मागे टाकलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


कोकणासाठी काय काय करणार?


हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कोकणाला निसर्गाचा वरदहस्त आहे. सावंडवाडीला आर्थिक चालनाला देण्यासाठी शॉपिंग सेंटर उभारलं जातं आहे. व्यापारी, कारागीरसोबतच आचरेकर यांच्या नावाचे ड्रेस रुम बांधण्यात येत आहे हे सुखद बाब आहे. बांद्याला क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे, - मल्टीस्पेशलिटी रुग्णालय प्रस्तावित आहेअसं ते म्हणाले.


'राणे साहेबांना मनापासून धन्यवाद'


बाळासाहेब नेहमी म्हणायचे नोकरी देणारे हात तयार करा आणि नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून आपण ते करु शकतो. राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन.  एमएसएमईच्या माध्यमातून मोठा निधी केंद्राकडून मिळत आहे. राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून कामं केलं जातील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.