राजापूर: कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात काल दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली होती. आज 36 तास उलटून गेले तरी दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असूनही सदर मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. माती हटवताना ढिगाऱ्याखाली असलेल्या प्रत्येक दगडांचा आकार इतका मोठा आहे की ते ब्लास्ट करून हटवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी ब्लास्ट मशीन मागविण्यात आली असून सर्व दगड ब्लास्ट करून रस्त्यावरील मातीचे ढिगारे, दगडांचे तुकडे बाजूला सारून रस्ता स्वच्छ व वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी तिसरा दिवस उजाडू शकतो, अशी माहित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. सदर मार्ग बंद असल्याने  पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर मार्गे कोकणात अनुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.


फोंडाघाटात दरीत कोसळलेला ट्रक बाहेर काढला


सिंधुदुर्गातील फोंडाघाटात चार दिवसांपूर्वी ३०० फुट खोल दरीत कोसळलेला माल वाहतुक करणारा ट्रक बाहेर काढण्यासाठी घाटातील वाहतूक तीन तास बंद करण्यात आली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तीन क्रेनच्या साहाय्याने घाटात कोसळलेला ट्रक बाहेर काढण्यात यश आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला किंवा जिल्हा बाहेर होणारी अवजड वाहतूक फोडा घाटातून सुरू आहे.


सिंधुदुर्गात पुरात अडकलेल्या मुक्या प्राण्यांना एनडीआरएफच्या पथकाने दिलं जीवदान


सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीला पूर स्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या २ शेळ्या आणि १ रेड्याला एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढल. पुराच्या पाण्यामध्ये बोटीने जाऊन चरण्यासाठी बांधण्यात आलेल्या रेड्याला बांधलेली दोरी तोडून सुखरूप बाहेर काढले. तर २ शेळ्या पुराच्या पाण्यात अडकल्या होत्या त्यांना देखील वाचवलं. त्यामुळे मुक्या जनावराला जिवदान दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९३ मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कुडाळ मध्ये १२४ मी.मी. पाऊस झाला.


सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं, आज यलो अलर्ट जारी


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात दोन दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रातभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे जिल्हातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये असं आव्हाहन प्रशासनाने केलं आहे.


वेगाची नशा जीवावर बेतली, दुचाकीची उभ्या कंटेनरवर धडक, दोघांचा जागीच मृत्यू


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली मधील वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ पहाटे २ ते २:४५ वा. च्या सुमारास उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या ऍक्टीवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसल्याने या दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण जागीच ठार झाले. या अपघातात मृत झालेल्या मध्ये कणकवली येथील संकेत सावंत, साहिल भगत असून अपघाताची तीव्रता सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.


आणखी वाचा


गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग