Sindhudurg News:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर नदी, नाले, ओढ्यांना देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज यलो अलर्ट  देण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात सकाळपासून सततधार पाऊस कोसळत होता. सायंकाळी पावसाने जोर धरल्यामुळे जिल्ह्यात सकल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात पडला असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.


कुडाळ तालुक्यातील माणगाव मधील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या तासाभरापासून या पूलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. तसेच माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पूल देखील पाण्याखाली गेलं आहे. तर कुडाळवरून माणगावला जाण्यासाठी झाराप माणगाव या रस्त्यावरील साळगाव मधील पूल देखील पाण्याखाली गेला आहे. 


सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला पूर आला आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरून माणगाव खोऱ्यात जाण्यासाठी जाणाऱ्या झाराप माणगाव रस्त्यावरील देखील दोन पुल पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यात पाणीच पाणी झाल्याची स्थिती सध्या सिंधुदुर्गात आहे.


कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान खात्याने दिली आहे.


सावंतवाडी शहरात दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील मुख्य बाजारपेठ जय प्रकाश चौक ते चंदूभवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. काही दुचाकी पाण्यात होत्या तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले होते. दुसरीकडे येथील पंचायत समिती परिसरात तब्बल गुडघाभर पाणी होते. पावसाळ्यात व्यवस्थित गटार साफ न केल्यामुळे हा प्रकार घडला, असे तेथील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरात आज तब्बल 4 ते 5 तास मुसळधार पाऊस झाला. यात कोणतीही हानी झाली नाही. परंतु जुन्या आरपीडीजवळील रस्त्यावर पाणी साचले होते. तेथील काही गाड्या पाण्यात होत्या. 


सावंतवाडी शहरातील अश्वत्थ मारूती माठेवाडा येथील पिंपळाच झाड कोसळले. यामुळे मंदिर परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. 


राज्यभरात जोरदार पाऊस


आज संपूर्ण दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसंच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली आणि चंद्रपुरात पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात येत आहे. 


इतर संबंधित बातम्या: