Sindhudurg Rains: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालपासून मुसळधार पाऊस (Sindhudurg Rain Updates) कोसळत असून मिळतील तेरेखोल नदी (Terekhol River) इशारा पातळीच्या खाली वाहत असली तरी देखील प्रशासनाने नदीजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात दरड कोसळली आहे. आंबोली घाटात (Amboli Ghat) दरड कोसळल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. आंबोली घाटात पावसाळ्यापूर्वी दरड कोसळू नये म्हणून जाळी बसवण्यात आली होती. तरी देखील मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. सध्या आंबोलीत दाट धुक्याची चादर, मुसळधार पाऊस असं वातावरण आहे. दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्यातील तेरेखोल, कर्ली नदी ओसंडून वाहत आहेत. तर तिलारी नदी, सुख नदी दुथडी भरुन वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल पासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नदी शेजारील गावतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तेरेखोल आणि कर्ली नदी ओसंडून वहात असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 110 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1442 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार स्वतः बांदा शहरात जात स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


चिपळुणात मुसळधार; वशिष्ठी नदी इशारा पातळीवर


रत्नागिरीतील (Ratnagiri News) जोरदार पावसामुळे वाशिष्टी नदी (Vashishti River) आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागल्या आहेत. नदीपात्रातील पाणी चिपळूणच्या काही सकल भागात शिरंल आहे. वाशिष्टी आणि जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिपळुणात रात्रीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. तसेच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.