सिंधुदुर्ग: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा 28 फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता. या पुतळ्यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीकेची प्रचंड झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे. 


महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे. 


राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र भावना शिवभक्तांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात उमटल्या होत्या. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी  सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. इच्छूक शिल्पकारांना 3 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल. त्यानंतर 4 ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. 


शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा जयदीप आपटे तुरुंगात


गेल्यावर्षी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला होता. जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नसतानाही भारतीय नौदलाकडून त्याला हे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे याला हा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये मिळाले होते, असा दावा विरोधकांनी केला होता. उर्वरित चौथरा आणि आजुबाजूच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्याने पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.


शिवाजी महाराजांचा किल्ल्यावरील पुतळा पडण्यासाठी वाऱ्याचा प्रचंड वेग कारणीभूत असल्याचा दावा महायुती सरकारच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता नवा पुतळा उभारताना या गोष्टींची काळजी कशी घेतली जाणार, नवा पुतळा किती फुटांचा असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 


आणखी वाचा


जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च


धक्कादायक! "महाराजांच्या पुतळ्यासाठी आपटेला आत्तापर्यंत 26 लाख पोहोचले, बाकी राणेंसाठी लोकसभेत खर्च"