Maharahstra Sindhudurg News : माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात आणि हा छंद त्याला एकदा जडला की तो काहीही करू शकतो. असाच एक छंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल मधील युवक ओंकार कदम याने जोपासला आहे. ओंकारला नाणी जमा करण्याचा छंद आहे. हा छंद त्याला लहानपणापासून लागला होता तो आजपर्यंत त्याने जोपासला आहे. हा छंद जोपासण्यासाठी ओंकार घरोघरी जाऊन वृत्तपत्र विकतो. आणि त्यासाठी त्याने आपल्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू केले आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल 185 देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी, इ. स. 302 व्या शतकापासून अनेक भारतीय सम्राटांनी आपापल्या काळात चलनात आणलेली नाणी जोपासली आहेत. आणि त्यांचा इतिहासही सुंदर पद्धतीने मांडला आहे.
ओंकार हा पदवीधर झाला असून त्याचे स्वत:चे किराणा मालाच्या दुकान आहे. आपल्या या व्यवसायाचा व्याप सांभाळत असतानाच ओंकारने आठवीपासूनच नाणी आणि नोटा जमविण्याचा छंद जोपासला आहे. त्याच्या या छंदाचे आज त्याने संग्रहालयात रूपांतर केले आहे. ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्यांचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे. हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा आणि नाणी जमवली आहेत. आपल्यासारख्याच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना, आपल्या देशासह विविध देशांच्या चलनांचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या नोटा आणि नाणी जमवण्यास सुरुवात केली. याबरोबरच त्याने इ. स. पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राज्यकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. जमा केलेल्या या नोटा, नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावीत आणि अभ्यासता यावीत, यासाठी त्याने संग्रहालय सुरु केलं आहे. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी, एवढेच नव्हे तर ज्या ज्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्षे राज्य केले, त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दितील चलनी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातीलही नाणी त्याने जतन केली आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत नोटांवर सह्या करणाऱ्या सर्व गव्हर्नरांच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या नोटा, या व्यतिरिक्त जुन्या आणि नव्या अशा वेगवेगळ्या नोटांची बंडल्स, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या सर्व नोटा या संग्रहालयात उपलब्ध आहेत. नोटा आणि नाण्यांबरोबरच विविध देशांची पोस्ट तिकिटेदेखील त्याने जमविली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व नाणी, नोटांचा लिखित इतिहास त्याने या संग्रहालयात उपलब्ध करून ठेवला आहे. भविष्यात कोकणची संस्कृती आणि कलेचं दर्शन घडविणारं एक मध्यम स्वरुपाचं कला दालन उभारण्याचा ओंकारचा मानस आहे. ओंकारच्या या संग्रहालयाला अनेक पर्यटक भेट देऊन जातात तसेच इतिहासाची माहिती घेऊन जातात.
महत्वाच्या बातम्या :
- कश्मिरी पंडितांचा आक्रोश भाजपच्या कानात जात नाही का? संजय राऊतांचा थेट सवाल
- नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रवादी-भाजपकडून मोर्चा, दोन्ही पक्षांचे मोर्चे समोरासमोर येण्याची शक्यता
- Kirit Somaiya : ठाकरे सरकारनंतर आता किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ठाकरे परिवार; "ठाकरेंच्या आणखी एका कंपनीची माहिती देणार"