Shiv Sena MP Sanjay Raut PC : काश्मिर रक्तबंबाळ आहे आणि सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करता? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला केला आहे. तसेच, कश्मिरी पंडितांचा आक्रोश भाजपच्या कानात जात नाही का? असाही सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. शिवसेना कश्मिरी पंडितांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "काश्मीर पुन्हा एकदा जळतोय. रोज रक्तानं भिजतोय. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीये आणि आपलं दिल्लीतील काही प्रमुख लोक चित्रपटांचं प्रमोशन करत आहेत. कधी कश्मीर फाईल्स, कधी पृथ्वीराच चौहानचं प्रमोशन होत आहे. हे सरकारचं काम आहे का? आणि कश्मिरी पंडितांचा आक्रोश कुणी ऐकायला तयार नाही."


"कश्मिरी पंडित, मुसलमान बांधव यांचीही हत्या होत आहे. आत्तापर्यंत 20 मुस्लीम सुरक्षा अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. कारण ते देशाचं संरक्षण करत होते. कश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मारलं जात आहे. पळवून लावलं जात आहे. पण सरकार काय करतंय?", असं संजय राऊत म्हणाले. 


काश्मिर रक्तबंबाळ आहे आणि सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करता?, राऊतांचा सवाल 


काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली. त्यावर बोलतना संजय राऊत म्हणाले की, "आठ वर्ष कसली साजरी करतायत? तिथे काश्मीर रोज हिंदूंच्या रक्तानं भिजून जातोय. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो काश्मिरी पंडित मुलाबाळांना घेऊन पलायन करत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकार भाजपाचं आहे. तुम्ही ताजमहाल, ज्ञानवापी मशिदीच्या खालचं शिवलिंग शोधताय. भाजपाला टीका करायला काय जातंय. काश्मिरी पंडित मरतायत त्याकडे पाहा. त्यावर बोला. टीका कसली करताय? 1990 साली काश्मिरी पंडितांचं हत्याकांड झालं, पलायन झालं तेव्हाही भाजपाच केंद्रात सत्तेत होती. आजही भाजपाच सत्तेत आहे."