सिंधुदुर्ग : कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा येत्या 2 मार्च ला होत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवण मधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.
नवसाला पावणारी भराडी देवी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.
देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो
सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
26 ते 28 डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद
आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर आज 26 ते 28 डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.