Maharashtra Sindhudurga News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga District) बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून (Chipi Airport)  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नविन वर्षाच एक गिफ्ट मिळणार आहे. फ्लाय 91 या कंपनीने पुढाकार घेऊन चिपी विमानतळावरून महत्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चिपी विमानतळावरून सुरू करत असलेल्या विमानसेवेत सुरुवातीला कंपनी बंगळुरु, हैदराबाद आणि जळगाव या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तर काही तांत्रिक समस्या व हवाई उड्डाण मंत्रालयाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पुणे आणि मुंबई येथेही सेवा सुरू करणार आहे.


देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता . यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे.  या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची भेट चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवे संदर्भात दिल्ली येथे भेट घेतली.  


 मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सकारात्मकरित्या सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलांयन्स व इंडीगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील.


पर्यटन व्यवसायाला फटका


पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जात असे. मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची आवश्यकता आहे, असे स्थानिकांनी म्हटले.  चिपी विमानतळावरून ब्लु फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे समुद्र किनारा 8 किलोमीटर असून मालवण सिंधुदुर्ग किल्ला 14 किलोमीटर तर वेंगुर्ले समुद्र किनारा 35 किलोमीटर तर राष्ट्रीय महामार्ग कुडाळ 25 किलोमीटर असल्याने चारी बाजूंनी पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणास मदत होणार असल्याचे म्हटले जात होते. आता, चिपी विमानतळावरून विमानसेवा अनियमित होत असल्याने त्याचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे.