Bioluminescent Fungus : तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी (Glowing Mushroom) पाहिलीत का? नाही ना... मग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चमकणारी अळंबी (Mushroom), तीही कोकणात (Konkan). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्रातील पहिलीच चमकणारी अळंबीची नोंद जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) झाली आहे. याआधी चमकणारी अळंबी केरळ (Kerala) राज्यात आढळली होती, त्यानंतर दुसरी नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच दुर्मिळ अळंबीची नोंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अगोदर चमकणारी बुरशी आढळली होती तीही तिलारी खोऱ्यात. मात्र आता चमकणारी अळंबी वेंगुर्ल्यात आढळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ 'बायोलुमिनिकन्स फंगी' म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा दुर्मिळ अळंबीची नोंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने समृद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
भीमाशंकर अभयारण्य आणि तिलारी खोऱ्यात प्रकाशमान अळंबीची नोंद
जगभरात 1000 अळंबीचे प्रकार आहेत. त्यापैकी 75 अळंबी या चमकणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र परिसरात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीची नोंद झाली आहे. परंतु होडावडे इथे आढळून आलेल्या चमकणाऱ्या अळंबीच्या प्रजातीची नोंद राज्यात प्रथमच झाली आहे. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
चकाकणाऱ्या अळंबीची वैशिष्ट्ये काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे चमकणारी अळंबी आढळल्याने संशोधकांनी आश्चर्य व्यक्त केले. जगभरात अंधारात चमकणाच्या अळंबीच्या साधारण 75 प्रजाती सापडतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच प्रकाशमान होतात. त्यांचा अधिवास हा प्रामुख्याने झाडाची साल आणि मृत झाडांच्या खोडावर असतो. चकाकणारी बुरशी साधारण 520 ते 530 एनएम तरंगलांबीचा हिरव्या रंगाचा प्रकाश निर्माण करते. हे प्रकाश उत्सर्जन सतत चालू असते आणि केवळ सजीव पेशींमधूनच प्रकाशाचे उत्सर्जन होते. प्रकाश उत्सर्जित करणारे वनपस्तीचे अवयव प्रजातीनुरुप वेगवेगळे असतात. या अळंबीची वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा महत्त्वाचा असतो.
राजापूरमध्ये 'चोहोळा' प्रजातीचे फूल आढळले
तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये 'चोहोळा' प्रजातीचे फूल आढळून आले आहे. राजापूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि पर्यावरणप्रेमी ए. के. मराठे यांना राजापुरातील रानतळे परिसरात हे फूल आढळले. पर्यावरणप्रेमी ए के मराठे यांना राजापुरातील रानतळे परिसरात हे फूल आढळले. त्यांचे कुतुहल चाळवले. या फुलाची छायाचित्रे काढून त्यांनी कुडाळ येथील कातळसडा अभ्यासक सौ. मानसी करंगुटकर यांचे मार्गदर्शन घेतले असता संबंधित फूल 'व्हाईट जिंजर लिली' कुळातील 'चोहोळा' या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातीचे असावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. गुगलवरही या फुलाबाबत फारशी वा पुरेशी माहिती उपलब्ध नाही. या फुलाशी साधर्म्य असणाऱ्या मोजक्या फुलांपलिकडे काही ठोस माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे या फुलाबाबत अधिक संशोधन होण्याची तसेच या दुर्मिळ असणाऱ्या आणि अस्तंगत होऊ पाहणाऱ्या प्रजातीचे जतन व संवर्धन होण्याची नितांत गरज असल्याचे मत या फुलाचे शोधक मराठे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा