सिंधुदुर्ग :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज सावंतवाडी येथे पोहोचली. या यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. याशिवाय त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर देखील टीका केली.

  


अमोल कोल्हे म्हणाले, सावंतवाडीत आल्यानंतर या मातीला नतमस्तक व्हावं, असं वाटतं. दिल्लीत संसदेत जातो तेव्हा बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते असतील या माणसांनी मराठी माणसाचा ठसा दिल्लीत उमटवला. नाथ पै, मधू दंडवते यांच्यासारखी माणसं सावंतवाडीतून दिल्लीच्या संसदेत गेले त्यामुळे संसदेत गेल्यावर आमचा उर अभिमानानं भरून येतो, असं अमोल केल्हे म्हणाले. 


छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी रोम रोम पुलकित होतो, अभिमानानं उर भरुन येतो. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार व्हावा, बाजूला सिंधुदुर्ग साडे तीनशे वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा, तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तेव्हा ही फक्त चूक नाही अपराध आहे, आणि त्याला माफी नाही ही खूणगाठ मनाशी बांधावी लागेल, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.  


मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषा साता समुद्रापार नेली. रंगभूमीवर मैलाचा दगड वस्त्रहरण हे नाटक ठरतं.  ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला अशा  एक फुल दोन हाफ असलेले सरकारच वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका एवढं सांगणं असल्याचं अमोल कोल्हे यांनी आवाहन केलं. 


दीपक केसरकरांचं नाव न घेता हल्लाबोल


सावंतवाडीत जॅकेटवाला जादूगार आहे असं कळतंय. जादूगाराची जादू मोठी आहे. वारंवार भूमिपूजन होत असून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नसेल तर काय बदलायचं हे तुम्ही ठरवा, असं अमोल कोल्हे म्हणाले. आता बदल हवो तर आमदार नवो असं अमोल कोल्हे म्हणाले.  


सतराशे कोटी रुपयांची निविदा शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निघालं, मुख्यमंत्री विधानसभेत गणवेश दाखवत होते. जे गणवेश शिवून आले ते मात्र गणवेश नीट नाहीत. दोन वर्ष एकच गणवेश घातला पोरांनी त्यामुळं दीपक केसरकर यांचे आभार माना, असा टोला अमोल कोल्हा यांनी लगावला.  


15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणल्यानंतर त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य आहे. त्यासाठी बदल  हवो तर आमदार नवो, असं अमोल कोल्हे म्हणाले.  ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. भूलथापांना बळी न पडता, इतिहास घडवा, असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं.


शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला. आता मंत्रिपदासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण ठेवण्याचं पाप या एक फुल दोन हाफ या सरकारनं केलं आहे,असा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केला.


इतर बातम्या :