सिंधुदुर्ग: महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दीच गर्दी होताना दिसत आहे.


उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. काही क्षणात धुक्यात व्यापून गेलेली दरी, ऊन पाऊस हा खेळ, याठिकाणी पर्यटकांना वेगळ्याच वातावरणाचा फील देतो. त्यामुळे याठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. 


विस्तीर्ण आणि खोल अशी आंबोली जवळील कावळेसादची दरी पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. या ठिकाणच्या वातावरणात पर्यटक धबधब्याच्या खाली न जाता या कावळेसाद पॉईंटला उभे राहिले तरी ओलेचिंब होतात. याच कावलेसाद पठारावरून वाहणारे पाणी जेव्हा या दरीत कोसळतं तेव्हा ते पाणी खाली न कोसळता पुन्हा वाऱ्यामुळे उलटं वर येतं आणि पाऊस पडत असल्याचा अनुभव देतं, ओलेचिंब करत. त्यामुळेच याठिकाणी पर्यटक मनसोक्त आनंद घेण्यासाठी आवर्जून भेट देतात.


अंबोलीत मोठा पोलीस बंदोबस्त
आंबोलीचा मुख्य धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांना मुख्य धबधब्याच्या मुळाशी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला असून स्वतः पोलीस त्याठिकाणी उभे आहेत. मुख्य धबधब्याच्या पायऱ्यांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मागच्या आठवड्यात झालेल्या गर्दीमुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असं नियोजन पोलिसांनी केलं आहे. सहा अधिकारी आणि 100 अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. 


देशभरातील पर्यटक सध्या आंबोलीत दाखल होत असून आंबोलीमधील मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेव नागरतास धबधबा, हिरण्यकेशी या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल होत आहेत.