मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने 'शट अप यार कुणाल' या पॉडकास्ट मध्ये घेतलेली मुलाखत पब्लिश झाली आहे. या मुलाखतीत नेमकं काय झालं याची उत्सुकता अवघ्या देशाला होती ती आता संपली आहे. कुणाल कामराने कंगना रनौत, सुशांत सिंह राजपूत, भाजप यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केलं आहे. बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे याचाही मुलाखतीतून उलगडा झाला आहे.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना रनौतची वक्तव्य चांगलीच चर्चेत होती. तिने राज्य सरकार, मुंबई पोलीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सातत्याने टीका केली होती. त्यानंतर तिच्या मुंबई महापालिकेने केलेली कारवाई चर्चेत आली होती. या कारवाई बाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, कंगना अभिनेत्री आहे. तिने म्हटलं होती की मी मुंबईत येत आहे, काय उखाडायचं उखाडा. त्यानुसार कंगनाच्या इच्छेनुसार मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवून उखाडून टाकलं. त्यानुसार सामनाने वृत्तांकन केलं आणि शीर्षक 'उखाड दिया' असं केलं होतं. ज्या जेसीबीने हे काम केलं त्याला पद्मश्री दिलं जाणार आहे, असा मिश्किल टोलाही संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामं आहेत. कंगनाचं ऑफिसचं बांधकामही अवैध होतं. कंगनावरही झालेली कारवाईही कायदेशीर आहे, असंही त्यांनी सांगितलं.


सुशांतला न्याय देणे आमची जबाबदारी


सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणावर बोलाताना त्यांनी म्हटलं की, सुशांतला मी बिहारचा मानतच नाही. सुशांत मुंबईचा होता. त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं. त्याला ओळख मुंबईत मिळाली. तो मुंबईचा मुलगा होता, त्याला न्याय देणे आमची जबाबदारी आहे. मात्र ओरडून सत्य लपणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी योग्यच होती. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा होता. मुंबई पोलीस देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यांना माफिया बोलणं चुकीचं आहे. मुंबई पोलीस तुमचं रक्षण करते हे लक्षात ठेवायला हवं, असं त्यांनी म्हटलं.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, या सरकारच्या गोष्टी आहेत. मराठा आरक्षण प्रकरण सु्प्रीम कोर्टातआहे, त्यावल लवकरच निर्णय होईल. मात्र जातीय आधारावर आरक्षण नसावं अशी भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे घेतली होती. व्यक्ती कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, गरीब गरजू नागरिकांना आरक्षण मिळायला हवं ही बाळासाहेबांची भूमिका होती. मागासवर्गींयांमध्ये वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.



प्रादेशिक पक्षांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याला जोडून राज ठाकरेंचा पक्षा वाढला पाहिजे या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रत्येक पक्षाला नेत्यांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून नेत्यांनी आपला पक्ष वाढवला पाहिजे. लोकांनी तुम्हाला स्वीकारलं तर तुमचा पक्ष मोठा होतो. मनसे काही वर्षांपूर्वी मोठा पक्ष होता.


देश एका पक्षावर चालणार नाही


यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. देश खुप मोठा आहे. देश एका पक्षावर चालणार नाही. एका विचारधारेनेही देश चालत नाही. 60 वर्षात अनेक पक्ष येऊन गेले. मात्र देश देश आहे. ट्रोल करणे, ब्लॉक करणे हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. भाजपसोबतच 25 वर्षांचं भावनिक नातं होतं. ते नातं तोडून नवीन आघाडी बनवताना दु:ख नक्कीचं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.