नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीही दिवाळी सीमेवर सैनिकांसह साजरे करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी पीएम मोदी यांनी ट्वीट करून देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त एक दिवा जवानांच्या नावाने प्रज्वलीत करण्याचं आवाहन केले होते. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अखंड खडा पहारा देत असलेल्या आपल्या बहादूर सैनिकांना सलाम करण्यासाठीही एक पणती या दिवाळीमध्ये लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.


‘देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अखंड खडा पहारा देत असलेल्या आपल्या बहादूर सैनिकांना मानवंदना म्हणून, एक पणती या दिवाळीमध्ये लावावी. आपले सैनिक दाखवत असलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांनी न्याय देणे अवघड आहे. जे सैनिक सीमेवर आहेत, त्यांच्या कुटुंबियाविषयीही आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.’’ अशा शब्दात ट्विटरवरुन या समाज माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.





पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी नियंत्रण रेषेला लागून जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सैनिकांसह दिवाळी साजरी केली होती.


नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचं युद्धबंदीचं उल्लंघन


नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला उत्तर देताना भारतीय जवानांनी गोळीबारात 7-8 पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना ठार मारले. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकचे सुमारे 10-12 सैनिक जखमी झाले आहेत आणि पाक लष्कराचे मोठ्या प्रमाणात बंकर व लाँच पॅड नष्ट करण्यात आले आहेत.


शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. त्यात तीन सुरक्षा कर्मचार्‍यांसह सहा जण ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने या ठिकाणांवर गोळीबार करत हल्ला केला.