Shiv Sena MP Meet Amit Shah: शिवसेना शिंदे गटाचे खासदार (Shiv Sena MP) आज दुपारी 4 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसद भवनातील कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सर्व खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वाची बैठक मानली जातेय. शिवसेनेच्या खासदारांनी अमित शाह यांना भेटण्याची वेळ मागितली होती. त्यानुसार खासदार आज त्यांची भेट घेणार आहेत. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे.  भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.


29 नोव्हेंबरला नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता


नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती. मात्र 26 तारीख कालच होऊन गेली. आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.  नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या:


देवेंद्र फडणवीसांनी त्यागाची भूमिका घेतली, आता मुख्यमंत्रीच व्हावेत, माजी सहकारमंत्र्यांची बॅटिंग